। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात बुधवारी (दि.19) सायंकाळी पीएनपी चषकाला सुरुवात झाली. यावेळी स्वाभीमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली. प्रेक्षणीय सामन्याबरोबरच प्रत्यक्ष क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती.
स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यु व्ही स्पोर्टस् अॅकेडमी आयोजित पीएनपी चषक 2025 या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 19 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी अलिबाग नगरपरिषद आणि अॅडव्होकेट अलिबाग या संघामध्ये प्रेक्षणीय सामना झाला. यावेळी वकील संघाने चार षटकात 69 धावा ठोकल्या. त्यामुळे नगरपरिषद संघासमोर विजयासाठी 70 धावांचे आव्हान होते. दोन्ही संघातील खेळाडूंनी विजयासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर हा सामना बरोबरीत सुटला. अखेर एका षटकाची सुपर ओव्हर देऊन सामना पुन्हा खेळविण्यात आला. या सुपर ओव्हरमध्ये वकील संघाने अधिक धावा करून संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे या प्रेक्षणीय सामन्याचे विजेतेपद वकील संघाने पटकावले. यामध्ये सामनावीर म्हणून अॅड. हर्षल पाटील ठरला.
त्यानंतर प्रत्यक्ष साखळी खेळाला सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात थळ टायपून्स आणि मुरूड थंडर्स या संघामध्ये सामना झाला. यामध्ये मुरूड संघाने पाच षटकात 45 धावा करीत थळ संघासमोर विजयासाठी 46 धावांचे लक्ष समोर ठेवले होते. या संघातील खेळाडूने सुरुवातीपासूनच दमदार फटकेबाजी करीत 4.3 षटकात 46 धावा करीत विजय आपल्या हाती घेतला. या स्पर्धेतील सामनावीर म्हणून सुजय पावशे याला आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील दुसर्या सामन्यात चौल चेसर्स आणि रामराज रायडर्स या संघामध्ये लढत सुरु झाली. सुरुवातीला रामराज संघाने पाच षटकात 35 धावा केल्या. चौल संघासमोर विजयसाठी 36 धावांची आवश्यकता होती. अखेर चौल संघातील फलंदाज विजयासाठी प्रयत्न करीत होते. रामराज संघातील खेळाडू देखील विजय आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर चौल चेसर्स संघाने 36 धावा करीत विजय आपल्याकडे खेचला. या स्पर्धेत करण कटोर हा खेळाडू सामनावीर ठरला.
त्यानंतर तिसर्या सामन्यात पहिल्या आणि दुसर्या स्पर्धेत विजयी ठरलेल्या थळ टायपुन्स आणि चौल चेसर्स या संघामध्ये सामना खेळविण्यात आला. चौल संघाने पाच षटकात 61 धावा केल्या होत्या. मात्र, थळ संघाने पाच षटकात 67 धावा करीत विजय मिळविला. परेश गावंड या खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी केल्याने तो सामनावीरचा सन्मान मिळविला. चौथ्या सामन्यात पहिल्या आणि दुसर्या सामन्यात पराभूत झालेले मुरूड थंडर्स आणि रामराज रायडर्स या संघामध्ये सामने घेण्यात आले. रामराज संघाने पाच षटकात 79 धावा केल्या. मुरूड संघाला विजयासाठी 80 धावांची गरज होती. मात्र, रामराज संघातील खेळाडूंनी मुरूड संघातील खेळाडूंना फक्त 27 धावा देत विजय आपल्याकडे खेचून घेतला. त्यामुळे या स्पर्धेत रामराज थंडर्स संघ विजेता ठरला असून निशांत कडवे या खेळाडूला सामनावीरचा सन्मान देऊन गौरविण्यात आले. शेवटच्या सामन्यात तिसर्या सामन्यातील पराभूत आणि चौथ्या सामन्यातील विजेता चौल चेसर्स आणि रामराज रायडर्स या संघामध्ये क्रिकेटचे सामने झाले. रामराज संघाने 50 धावा करीत चौल संघाला पराभूत केले. या स्पर्धेतील सामनावीर केदार बिर्जे ठरला. या स्पर्धेतील विजेता संघ सुपर 12 मध्ये पोहचला आहे.
दरम्यान, या स्पर्धा पाहण्यासाठी आझाद मैदानात प्रेक्षकांनी अलोट गर्दी केल होती. आयपीएलच्या धर्तीवर पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धा पाहण्याची संधी मिळाल्याने अनेकांनी या स्पर्धेबाबत आनंद व्यक्त केला. उत्कृष्ट नियोजन केल्याने नृपाल पाटील व चित्रलेखा पाटील यांचे कौतूक होत आहे.