पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कुरुळ येथील आझाद मैदानात 19 फेब्रुवारीपासून पीएनपी चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दुसर्या दिवशी दुपारी बारानंतर पुन्हा खेळाला सुरुवात करण्यात आली. सुरूवातीला अलिबाग पत्रकार आणि अलिबाग पोलीस यांच्यामध्ये प्रेक्षणीय सामना झाला. या सामन्याचे उद्घाटन रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी यू.व्ही. स्पोटर्स अॅकेडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक आदी मान्यवर पत्रकार, पोलीस व खेळाडू उपस्थित होते. प्रेक्षणिय सामन्यात अलिबाग पोलिस संघाने नाणे फेक जिंकली. या संघाने सुरुवातीला फलंदाजी स्विकारली. अलिबाग पत्रकार संघाने क्षेत्ररक्षण केले. अलिबाग पत्रकार संघाच्या गोलंदाजासह क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक यांनी पोलीस संघाला कमी धावा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस संघातील शुभम नांदगावकर या खेळाडूने जोरदार फटकेबाजी करीत चार षटकात 54 धावा ठोकल्या आणि अलिबाग पत्रकार संघासमोर विजयासाठी 55 धावांचे लक्ष ठेवले.
यावेळी मात्र, पोलीस संघाने उत्कृष्ट गोलंदाजी, यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षण करीत अलिबाग पत्रकार संघाला फक्त 32 धावांमध्ये हा खेळ संपविण्यास भाग पाडले. त्यामुळे अलिबाग पोलीस संघ प्रेक्षणीय सामना विजेता ठरला असून पोलीस कर्मचारी शुभम नांदगावर याला सामनावीरचा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.