। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील किहीम समुद्र किनारी बुधवारी (दि.4) ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्र कासवाने अंडी घातली आहेत. दुर्मिळ असल्याने त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे आवाहन कांदळवन दक्षिण कोकण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
ऑलिव्ह रिडले समुद्री मादी कासव रात्रीच्या वेळी समुद्रकिनार्यापासून थोड्या अंतरावर वाळूमध्ये खड्डा तयार करते. वाळूच्या खाली 100-150 या प्रमाणात अंडी देते. पुन्हा वाळूच्या साहाय्याने अंडी बुजवते आणि समुद्रामध्ये निघून जाते. अंडी वाळूच्या खड्ड्यांमध्ये स्वतःच उबतात. समुद्री कासव इतर प्राण्याप्रमाणे त्या जागी अंडी उबवण्यासाठी थाबंत नाहीत. त्यासाठीच संवर्धन करणे गरजेचे असते. रात्री समुद्रकिनारी गस्त घालून या कालावधीमध्ये समुद्री कासवांनी तयार केलेली घरटी शोधून घरट्यांमध्ये घातलेली अंडी योग्य पध्दतीने खड्डा खोदून, हाताळून समुद्र किनारी जाळीबंद हॅचरीमध्ये कृत्रिमरित्या वाळूमध्ये उबवण्यासाठी ठेवणे अतिशय गरजेचे असते.
ऑलिव्ह रिडले दुर्मिळ समुद्री कासवाच्या संरक्षणासाठी चारही बाजूने जाळी लावून तेथे रखवालदार नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी डीएफओ कांचन पवार, एसीएफ प्रियांका पाटील, आरएफओ समीर शिंदे व कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सरपंच प्रसाद गायकवाड व नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.