। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड हे नेहमीच काही ना काही वादग्रस्त विधान करत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार सोहळ्यात गायकवाड यांनी मतदारांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरला. इतकेच नाही, तर त्यांनी मतदारांना शिवीगाळसुद्धा केली. गायकवाड यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत संतापले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेतील या आमदाराचा राजीनामा घ्यावा, असे राऊतांनी म्हटले आहे.
आ. संजय गायकवाड यांनी एका सत्कार समारंभात भाषण करताना आमदारांना शिवीगाळ केली. ते म्हणाले की, तुम्ही फक्त एक मत मला देऊ शकत नाही. फक्त दारू, मटण आणि पैसे. अरे दोन-दोन हजारात विकले गेले भाड साले. यांच्यापेक्षा तर वेश्या बर्या.’’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सगळीकडे जोरदार व्हायरल करण्यात आला. याबाबत खा. संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी सोमवारी (दि.06) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल, संविधानाला कोणी गुलाम मानत असेल आणि त्यातही ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ही त्यांची जबाबदारी आहे.
तसेच, दोन-दोन हजारांना मतदार विकत घेऊन, त्यांना अशा प्रकारे अश्लील बोलणे, वेश्या बोलणे या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी मत व्यक्त केले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे मतदारांना विकत घेण्यात आले, हे आम्ही आधीच सांगितले होते, असे यावेळी खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. तर, शिंदे गटाचे जे आमदार आहेत, संजय गायकवाड यांनी केलेले विधान हे अधिक गंभीर आहे. या महाराष्ट्रातील कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल तर त्यांच्या नेत्यांनी म्हणजे एकनाथ शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. यांना मतदार वेश्या वाटतात. त्यांचे मत तुम्ही लोकांनी पैसे देऊन विकत घेतले असेल, हे मी मान्य करतो. पण तुम्ही त्यांना वेश्या म्हणत आहात. मी तुमचा गुलाम आहे का? असे अजित पवार म्हणत आहेत. पण यांना कोणत्या गोष्टीचे नैराश्य आले आहे, हे या राज्याला समजले पाहिजे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.