संजय राऊत यांचा आरोप
। मुंबई । प्रतिनिधी ।
महायुतीचे सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर दहा दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. त्यालाही 22 दिवस होत आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून पालकमंत्री नेमलेले नाहीत. तीन पक्षांचे महायुती सरकार असल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी त्यांना पालकमंत्र्यांची नेमणूक करणे सोपे नाही. कोणाचीही पालकमंत्री म्हणून नेमणूक केली तरी धुसफूस सुरु राहणार आहे, असा टोला खा. संजय राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत म्हणाले की, तीन पक्षांचे हे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी त्यांना पालकमंत्र्यांची नेमणूक करणे सोपे नाही. कोणाचीही पालकमंत्री म्हणून नेमणूक केली तरी महायुतीमध्ये धुसफूस होणार आहे. फक्त एवढ्यावरच धुसफूस होणार नाही, त्यांच्यातील हा वाद शेवटपर्यंत असाच सुरु राहणार असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे.
ते पुढे म्हणाले की, ठाणे, रायगड, गडचिरोली, पुणे, नागपूर या जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमणुका करणे महायुती सरकारमधील नेत्यांसाठी सोपे नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना पालकमंत्रीपद जाहीर करता येत नाही, हे वाईट आहे. देशाचा प्रजासत्ताक दिन 20 दिवसांवर आला आहे. अजूनही पालकमंत्र्यांची नेमणूक केलेली नाही. पालकमंत्री हे जिल्ह्याजिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण करतात. मात्र, 26 जानेवारी जवळ येईपर्यंत पालकमंत्रीपद जाहीर करता न येणे वाईट आहे. पालकमंत्रीपदाचा हा तिढा शेवटपर्यंत कायम राहील, महायुतीमधील ही धुसफूस सुरुच राहणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.