आरोग्य कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित करा- आ. जयंत पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी कोव्हीड 19 मध्ये जिवावर उदार होऊन काम केले आहे. तसेच अजून कोरोनाचे रुग्ण कमी झालेले नसल्याने सदर कर्मचार्‍यांना पुन्हा कायमस्वरुपी नियमित करण्याची तसेच सेवा भरतीत प्राधान्य देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. बेकारीची कुर्‍हाड कोसळलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी शेतकरी भवन येथे आ. जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपल्यावर होत असलेला अन्याय दुर करण्यसाठी साकडे घातले. त्यानुसार आ. जयंत पाटील यांनी त्वरीत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना याबाबतचे पत्र दिले आहे. यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकापचे पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते.

31 ऑगस्ट 2021 पासून सदर कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांची सेवा संपुष्टात आणण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे हवालदिल झालेल्या कर्मचार्‍यांनी सेवेत कायम करून घेण्याची मागणी केली आहे. कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यावर शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एप्रिल हजारो अधिकारी कर्मचार्‍यांना नियुक्त केले होते. मात्र, आता करोनासंकट कमी झाल्याने डॉक्टर वगळता इतर कर्मचार्‍यांना कार्यमुक्त केले जात आहे. रिक्त पदे असल्याने आम्हाला पुन्हा सेवेत घ्या, या मागणीसाठी कोव्हिड केंद्रांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी शासनाकडे मागणी केली आहे. त्यासंदर्भात आ. जयंत पाटील यांची भेट घेतली होती.

आ. जयत पाटील यांनी मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यात कोव्हीड 19 चा पादुर्भाव वाढत असल्यामुळे कोव्हीड रुग्णांच्या उपचारासाठी तसेच त्यांच्या सेवेसाठी शासनाकडून तात्पुरत्या स्वरुपाच्या रुग्ण सेवकांची भरत करण्यात आली होती. त्याप्रमाणे भरती करण्यात आलेले रुग्ण सेवकांनी कोव्हीड 19 च्या महामारीत जीवाची पर्वा न करता कोव्हीड 19 कालावधीत तसे आजपर्यंत जीवावर उदार होऊन चांगली सेवा केली आहे. परंतु शासनाने त्या सर्वांना कोणतीही पुर्व सुचना न देता अचानकच कामावरुन कमी करुन त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे.

रायगड जिल्हा हा कोव्हीड 19 हॉटस्पॉट म्हणून जिल्हा असून तसेच रायगड जिल्ह्यातील बहुतांश कोरोना रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णायात उपचारासाठी येत असतात. तसेच कोरोना रुग्णांजवळ त्यांच्या उपचारासाठी व सेवेसाठी त्यांच्या नातेवाईकांसह इतर कोणीही जात नसताना हे कर्मचारी आपली सेवा जबाबदारीने पार पाडत असतानाही त्यांना सदर सेवेतून कोणतीही पुर्व सुचना न देता कामावरुन कमी करण्यात आले आहे. परंतु शासनाकडून नव्याने भरण्यात येणार्‍या आरोग्य सेवकांची भरती करण्यात येणार असल्यामुळे कोव्हीड 19 कालावधीत शासनाकडून तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्यात आलेल्या सर्व रुग्ण सेवकांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना सेवेत सामावून घेणेत यावे, तरच त्यांना त्यांच्या केलेल्या कामाचे फळ मिळणार आहे.

तसेच रायगड जिल्ह्यात आताही बहुसंख्येने कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळे त्यांच्या उपचार सेवेसाठी या अनुभवी कर्मचार्‍यांची आवश्यकता असल्यामुळे त्यांना सदर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सलग सेवेवर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात कोव्हीड 19 कालावधीत शासनाकडून तात्पुरत्या स्वरुपी भरती करुन त्यांना सेवेत रुजू करुन या सर्व अनुभवी रुग्ण सेवकांना सेवेतून कमी न करता त्यांना विशेष बाब म्हणून सेवेत कायमस्वरुपी ठेवण्याची मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version