। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) शनिवारी (दि. 01) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही अर्थसंकल्पात मोठा दिलासा देण्यात आला आहे. टीडीएसची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. त्याच वेळी, भाड्यावरील वार्षिक टीडीएस मर्यादा 2.4 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पात (2023-24) ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजनांच्या ठेव मर्यादा वाढवण्यात आल्या होत्या. या योजनेची कमाल ठेव मर्यादा 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये करण्यात आली. गेल्या वेळी मासिक उत्पन्न खाते योजनेची ठेव मर्यादाही वाढविण्यात आली होती. वैयक्तिक खात्यांसाठी कमाल ठेव मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यांसाठी 9 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात आली. इतकेच नाही तर गेल्या अर्थसंकल्पात (2023-24) ज्येष्ठ नागरिकांना करात सवलतही देण्यात आली होती. नवीन कर प्रणाली अंतर्गत, पगारदार कर्मचार्यांसाठी मानक वजावट रुपये 50,000 वरून 75,000 रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, पेन्शनधारकांसाठी कौटुंबिक पेन्शनवरील कपात 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे.