गणेशभक्त टोलमुक्त
| मुंबई | प्रतिनिधी |
गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या गणेशभक्तांना गुरुवार, दि. 5 ते 19 सप्टेंबर या कालावधीत टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.
गणेशोत्सव हा सण कोकणातील सर्वात मोठा सण आहे. संपूर्ण कोकणामध्ये गणेशोत्सवाचे वातावरण हे वेगळेच असते. लाखोंच्या संख्येने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पुणे शहरातील कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी जातात. कुटुंबासह हा सण साजरा करतात. त्या चाकरमान्यांचा विचार करत राज्य सरकारने घेतलेला टोलमाफीचा निर्णय महत्वाचा आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दि.14 ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने टोलमाफीचा शासन निर्णय जारी केला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्यादेखील सूचना आहेत.
गणेशोत्सव, कोकण दर्शन नावाचे स्टीकर्स
कोकणात जाणार्या वाहनांना ‘गणेशोत्सव-कोकण दर्शन’ या नावाचे स्टीकर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. टोल सवलतीचा हा कालावधी दि. 5 ते 19 सप्टेंबर असा सुमारे पंधरा दिवसांचा असेल. यासाठी स्थानिक पोलीस ठाणे व प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनांची नोंदणी करून त्यांच्याकडून वाहनांवर लावण्यासाठी स्टिकर घ्यावे लागणार आहेत. पुण्याहून निघाल्यानंतर चिपळूणकडे जाणारी वाहने कराडपासून पाटणमार्गे रत्नागिरी, राजापूरला जाणारी वाहने किणी-वाठार वारणानगर-कोडोलीमार्गे आंबा घाटातून जातील.
कुठे टोल नाही
मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बंगळुरु महामार्ग तसेच इतर सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या टोलनाक्यांवर गणेशभक्तांना टोल माफ केला जाणार आहे. राज्य सरकाराच्या वतीने शासकीय परिपत्रक काढून टोल प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत.
मोफत पाससाठी कुठे संपर्क?
गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या सर्व गाड्या आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या बसेसदेखील टोल नाक्यावर मोफत सोडल्या जाणार आहेत. मोफत पास सवलतीसाठी संबंधित वाहतूक विभागाकडे संपर्क करावा, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.