मुरूड-रोहा तालुक्यातील दुर्गम भाग अंधारात

18 गावे काळोखात; म्हसाडीमध्ये बिबट्याची दहशत

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुसळधार पावसामुळे मुरूड-रोहा तालुक्यातील सीमारेषेवरील दुर्गम भागातील सुमारे 18 गावे गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा बंद पडत असल्याने रोज अंधारात बुडून जात असल्याची माहिती रोहा तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष अनंत गोरे यांनी दिली. परिसरात सर्वत्र डीम वीज असून, हा दोष काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा येथे दाखल झालेली नाही. शनिवारी रात्री बिबट्याने अनंत गोरे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवून ठार केल्याची माहिती वैभव गोरे यांनी रविवारी बोलताना दिली.

म्हसाडी, कांटी, बोडण, केळघर, वानदर कोंडा, खडकी, गोपालवट, फणसवाडी, मांगीरवाडी, साठलेवाडी, आराळी, वाघिरपट्टी आदींसह काही वस्तीवर वीजपुरवठा खंडित अथवा डीम राहात असल्याने परिसर रात्री अंधारात बुडून जात असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मोबाईल चार्जिंगविना बंद पडले आहेत. हा डोंगरी दुर्गम भाग असल्याने आजारी व्यक्ती किंवा आपत्कालीन घटना घडल्यास संपर्क करणे मुश्किल बनले आहे. लाईट डीम असून, विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी चार दिवसांत कोणीही महावितरणाचा कर्मचारी फिरकलेला नाही, अशी माहिती अनंत गोरे यांनी दिली. केळघर ते मुरूड ही एकमेव एसटी सेवा दीड ते दोन महिन्यांपासून बंद असल्याने सर्व नागरी व्यवस्था ठप्प आहे. या भागात वीजपुरवठा स्थिर राहतच नाही. त्यामुळे मोबाईल चार्जिंग, दूध, खाद्यपदार्थ, आजारी माणसाची सेवा, हिंस्त्र प्राण्यांची भीती सतत असते. वीज नसेल तर कोणतीही दुर्घटना घडू शकते. मोठा परिसर असूनही कायमस्वरुपी येथे वायरमन नियुक्त नाही.

घोसाळे, विरजोली (ता. रोहा) या गावांतून येथे वायरमन येत असतो. परिसरात कोणताही कर्मचारी राहात नाही. त्यामुळे अचानक वीजपुरवठा बंद पडल्यास रात्र अंधारात काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे अनंत गोरे यांनी सांगितले. पावसाळ्यात विजेची समस्या अधिक वाढते. अशा अंधारात जनजनावरांची, वन्य हिंस्त्र पशुंच्या हल्ल्याची भीती सतत असते. डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या दुर्गम भागातील हा परिसर असल्याने असुविधेमुळे संपर्कहीन होत असतो. त्यामुळे येथील ग्रामस्थ, आजारी रुग्ण त्रासले असून शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही सर्व गावे रोहा तालुक्यातील असली तरी मुरूड तालुका आणि जवळ सीमेवर असल्याने यांची बाजारहाट, वैद्यकीय, शालेय सुविधांसाठी ही मंडळी मुरूडमध्ये अधिकतर येत असतात. येथे मुरूड ते केळघर अशी एकमेव एसटी बससेवा असून, तीदेखील एक दीड महिन्यापासून बंद असल्याने समस्येत अधिक भर पडल्याचे गोरे यांनी सांगितले.

मुरूड ते केळघर हे अंतर 17 किमी असून एसटी बस सेवा बंद असल्याने या दुर्गम भागातील ग्रामस्थांना रोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतआहे. बस नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना गैरहजर राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सर्वजण हैराण झाले असल्याची माहिती मुरूड तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष धर्माजी हिरवे यांनीदेखील अनंत गोरे यांच्याबरोबरच बोलताना दिली.

ग्रामस्थांकडून संताप व्यक्त
दुर्गम भागातील या 18 गावांकडील भागात प्रशासनाने किमान अतिवृष्टी, संकट काळात तरी अधिक जागरूकतेने लक्ष देण्याची गरज असताना ग्रामस्थांना जणू वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत असून, सर्वत्र संतापाची लाट उठली आहे. ‌‘अजब तुझे सरकार म्हणत’ फक्त निवडणुकीपूरता आमचा वापर केला जातोय, अशा संतप्त भावना अनेक ग्रामस्थांनी प्रतिनिधीपाशी व्यक्त केल्या.

Exit mobile version