स्थानिकांची शासनाकडे मागणी
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान या पर्यटनस्थळाला 2003 मध्ये इको सेन्सेटिव्ह झोन लागू केल्यापासून आवश्यक असणार्या महत्त्वाकांक्षी विकासकामांना परवानगी घेण्यासाठी शासनाने नेमलेल्या सनियंत्रण समितीच्या परवानगीशिवाय आणि त्यांच्या जाचक अटींमुळे काहीही करता येत नाही. त्यामुळे एकप्रकारे माथेरानच्या विकासाला जे काही अडसर निर्माण होत आहेत, ते शासनाने दूर करावेत, अशी मागणी होत आहे.
हेरिटेज वास्तूंच्या डागडुजी असोत किंवा रहदारीच्या दगड मातीच्या रस्त्यांचा प्रश्न असो, या सनियंत्रण आणि हेरिटेज समितीच्या परवानगीशिवाय कामे पूर्ण करता येत नाहीत. इको सेन्सेटिव्ह झोन लागू असल्याने सनियंत्रण समितीचे पदाधिकारी मुळात इथे वास्तव्यास नसताना या गावाविषयी त्यांनाच अधिक प्रेम असल्याचा आविर्भाव आणून विकासकामांना आडकाठी आणली जात आहे. यामुळेच येथील रस्त्यांची अद्यापही दुरुस्ती होऊ शकलेली नाही. यातच या गावात पूर्वीपासून विकासाला विरोध करणारी मंडळी आजही कार्यरत असल्याने लहान सहान बाबींची इत्यंभूत माहिती एखाद्या खबर्यांप्रमाणे नियमितपणे सनियंत्रण समितीच्या पदाधिकार्यांना दिली जाते, असेही बोलले जात आहे.
एकीकडे जग एकविसाव्या शतकात वाटचाल करीत असताना याठिकाणी जुन्याच विचारांना, व्यवसायांना स्थान देण्यात धन्यता मानणार्या लोकांमुळे हे गाव प्रगतीपथावर जाऊ शकलेले नाही. मुळात, ज्या गावातील रस्ते सुस्थितीत नाहीत, त्या गावाचा विकास कदापि होऊ शकत नाही. हे जरी त्रिवार सत्य असले, तरीसुध्दा आजच्या कमाईवरच खुश होऊन भविष्याची आपल्या भावी पिढीची चिंता नसणार्या इथल्या काही मंडळींमुळे या गावाचा विकास होण्यास विलंब लागत आहे. आगामी काळात पर्यटकांना ने-आण करण्यासाठी ई रिक्षा सर्वत्र सेवा उपलब्ध करुन देणार आहेत, त्यासाठी आवश्यक ठिकाणी उत्तम दर्जाचे क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांशिवाय पर्याय उरलेला नाही.