महामार्गावरील डागडुजी निव्वळ दिशाभूल

भरलेल्या खड्ड्यांतील खडीमुळे धुळीचे साम्राज्य
प्रवाशांच्या जिवाला धोका

| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड ते नागोठणेदरम्यानच्या रस्त्यावरील काही खड्डे भरले तर काही ठिकाणी तसेच आहेत. जे खड्डे भरले आहेत, ते भरण्यासाठी खड्डीमिश्रित डांबर ही नाममात्र वापरली असल्यामुळे खड्ड्यातून खडी वर येऊन रस्त्यावर पसरली आहे. यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले असून, प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खड्डे भरून जनतेची दिशाभूल केली जात आहे.

महामार्गावरील खड्डे व महामार्गावरील रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंबेवाडी नाक्यावर मानवी साखळी आंदोलन केले होते. त्या आंदोलनात संबंधित ठेकेदारांनी महामार्गावरील खड्डे व महामार्गाच्या रस्त्याचे काम एका महिन्याच्या आत सुरु होईल, असे आश्‍वासन दिले होते, ते फोल ठरलेले दिसत आहे. कारण जे खड्डे भरले आहेत, ते निकृष्ठ दर्जाचे आहे. तर कुंडलिका नदीवरील पूल, महिसदरा नदीवरी पूल, पुई पेट्रोल पंप, भिरा फाटा व इतर ठिकाणाचे खड्डे अद्याप भरले गेले नाहीत. आजूबाजूला आठ दिवसांपूर्वी खड्डी टाकून वाहनचालकांची अडचण केली आहे. भरलेल्या खड्ड्यातील खडी वर येऊन रस्त्यावर पसरली आहे.

यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ही धूळ वाहनचालकांसह प्रवाश्यांच्या नाका तोंडात जाऊन सर्दी, खोकला व पोटाचे विकार या आजारांचा सामना करावा लागत आहे. या महामार्गावरील खड्ड्यांतून व धुळीतून प्रवास करताना एखाद्या वाहन चालक किंवा प्रवाशांचा नाहक जीव गेला तर त्याचे पुर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल प्रवाशांतून केला जात आहे.

Exit mobile version