जागोजागी वारंवार फुटूनतात जलवाहिन्या
| श्रीवर्धन | वार्ताहर |
मागील दोन वर्षांपासून श्रीवर्धन नगरपरिषदेने जलशुद्धीकरण प्रकल्प व शहरातील जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले होते. सदरचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते. दोन वर्षे ठेकेदाराकडून श्रीवर्धन शहरामध्ये ठिकठिकाणी खोदकाम सुरू होते. त्यामुळे प्रचंड धुरळा सर्वत्र उडत होता. धुरळ्यामुळे नागरिकांना विविध प्रकारचे आजारदेखील होत होते. परंतु, शहराला शुद्ध पाणी पिण्याचे मिळणार, या हेतूने कोणीही तक्रार केली नाही.
मात्र, जलवाहिन्या बदलून झाल्यानंतर टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे निष्पन्न होत आहे. कारण, जलवाहिन्या नवीन टाकल्यापासून जागोजागी जलवाहिन्या फुटून लाखो लीटर पाणी वाया जाण्याचा प्रकार घडत आहे. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत संबंधित ठेकेदाराची माणसे श्रीवर्धन शहरामध्ये वास्तव्यास होती. त्यामुळे कोठेही जलवाहिनी फुटली तरी, त्या ठिकाणी रात्री जेसीबी लावून जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम केले जात होते.
मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर ठेकेदाराची माणसे निघून गेली आहेत. आता जलवाहिनी फुटल्यानंतर दुरुस्ती कोण करणार? हा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. आजच सकाळी श्रीवर्धन शहरातील आंबेडकर चौकामध्ये जलवाहिनी फुटून पाणी वाया जात आहे. यावर्षी पाऊस काहीसा मुबलक प्रमाणात झाला असला तरीही अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय झाला तर उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी श्रीवर्धन नगर परिषदेने संबंधित ठेकेदाराकडून जलवाहिन्या का फुटतात? याबाबत विचारणा करून त्या तातडीने दुरुस्त करून घ्याव्यात, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.