। अलिबाग । वार्ताहर ।
साळाव येथील जिंदाल विद्यामंदिरात 76 वा प्रजासत्ताक दिन रविवारी (दि.26) देशभक्तीच्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रभोध आचार्य (कार्यकारी उपाध्यक्ष, शाश्वतता) यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली.
या सोहळ्याप्रसंगी मान्यवर पाहुणे म्हणून पंकज मलिक (अध्यक्ष, एसएमसी) आणि उपप्राचार्य मंगेश बामनोटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे भव्य मार्च पास्ट, ज्यामध्ये जेएसडब्ल्यू सुरक्षा पथक, हाऊस संघ आणि स्काउट्स व गाईड्स यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गटगाणे, मराठी कविता सादरीकरण, मास ड्रिल, पिरॅमिड प्रदर्शन आणि रंगीत देशभक्तीपर नृत्य अशा उत्कृष्ट सादरीकरणांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. स्काऊट्स आणि गाईड्सनी प्राथमिक उपचार तंत्रांचे प्रात्यक्षिक सादर केले. तर, कराटे प्रदर्शन आणि टाईल फोडण्याच्या कौशल्याला जोरदार टाळ्या मिळाल्या.
पाहुण्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी विद्यार्थ्यांना शिस्त, शाश्वतता आणि संविधानातील मूल्यांचे पालन करण्यासाठी प्रेरित केले. एकात्मता आणि अभिमान साजरा करणार्या या संस्मरणीय कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.