निवृत्त प्राध्यापकाची फसवणूक

डिजिटल अरेस्टची भीती दाखवत लुटले

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

दापोली तालुक्यातील एका उच्चशिक्षित माजी प्राध्यापकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 23 लाख उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तुमच्या बँक खात्यातून 3 कोटींचा फ्रॉड झाला आहे, अशी बतावणी करून तोतया सीबीआय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी लुटले. याप्रकरणी 3 संशयितांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली येथील डॉ. मकरंद श्रीनिवास जोशी (62) हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथून विस्तार शिक्षण संचालक पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना 4 नोव्हेंबर 2025 ते 19 जानेवारी 2026६ या कालावधीत मोबाईलवर संपर्क साधून आपण बंगळुरू पोलीस आणि नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. जोशी यांच्या नावे कॅनरा बँक शाखा माटुंगा (मुंबई) येथे खाते असून त्यात 3 कोटी रुपयांचा फ्रॉड झाला असल्याची बतावणी केली. तसेच त्यांना 50 लाख रुपये दंड भरावा लागेल, असं सांगत डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवण्यात आली.

अटकेच्या भीतीने मकरंद जोशी यांनी आरोपींनी सांगितलेल्या ॲक्सिस बँक (तुळजापूर), आयडीएफसी बँक (मुंबई) आणि आयसीआयसीआय बँक (वाशी) या विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण 1 कोटी 23 लाख रुपये भरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version