पेंढा विक्रीतून शेतकऱ्यांना दिलासा; दर शेकडा 500 रुपयांवर जाण्याची शक्यता
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
यंदा पावसाने ओढ दिल्याने श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील भात कापणी, झोडणी आणि मळणीची कामे पूर्ण झाली असून, आता शेतकऱ्यांकडे असलेला भाताचा पेंढा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत असताना, पेंढा विक्रीतून त्यांना थोडा का होईना आर्थिक हातभार लागणार आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या सुक्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन स्थानिक पशुपालक आणि दूध उत्पादकांनी आतापासूनच वर्षभराचा चारा साठवून ठेवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दुसरीकडे, कोकणातील आंबा हंगामात हापूस आंब्याच्या पेट्या भरण्यासाठी (पॅकिंगसाठी) मोठ्या प्रमाणावर पेंढ्याची गरज भासते. त्यामुळे तालुक्यात पेंढ्याला दुहेरी मागणी निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी पेंढ्याचा दर चारशे रुपये शेकडा इतका होता. मात्र, यंदा भात पिकाचे क्षेत्र आणि उत्पन्न घटल्याने पेंढ्याचे प्रमाण कमी आहे. वाढती मागणी आणि कमी पुरवठा यामुळे सद्यःस्थितीत पेंढ्याच्या दरात शंभर रुपयांनी वाढ होऊन हा दर पाचशे रुपये शेकडापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यातील अनेक गावांत शेतकऱ्यांनी खळ्यावर पेंढ्याच्या गंजी रचून ठेवल्या आहेत. भाताचे उत्पन्न घटल्याने झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी हा सुका चारा विकणे, शेतकऱ्यांसाठी गरजेचे बनले आहे. सध्या पशुपालक आणि बागायतदार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पेंढ्याची खरेदी करत आहेत. संभाव्य टंचाई टाळण्यासाठी गरजूंनी वेळेवर संपर्क साधून पेंढा आरक्षित करावा, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.
आंबा हंगामात फळांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आणि पॅकिंगसाठी भाताचा पेंढा अत्यंत महत्त्वाचा असतो. यंदा दुष्काळामुळे पेंढ्याचे उत्पन्न कमी आहे.पशुपालकांसोबतच आंबा बागायतदारांनाही याची मोठी गरज भासणार असल्याने यंदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांनी आतापासूनच पेंढ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
वैभव कर्णेकर
आंबा बागायतदार, श्रीवर्धन
