पारंपरिक पेहराव व ग्रामीण बाज
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
ओटी भरणे कार्यक्रमा प्रमाणेच आता मॅटर्निटी फोटोशूटला महत्त्व येत आहे. सध्या जिल्ह्यात मॅटर्निटी फोटोशूटचा ट्रेंड वाढत आहे. यामध्ये पारंपरिक पेहराव व ग्रामीण बाज याला अधिक पसंती मिळत आहे. पुणे मुंबई आदी शहरातील लोक यासाठी रायगड जिल्ह्याला पसंती देत आहे.बाळ आईच्या उदरात असतांनाच्या गोड आठवणी जोपासण्यासाठी होणारे आई-बाबांची या मॅटर्निटी शूटला मागणी आहे. पाच्छात्य पेहरावा पेक्षा ग्रामीण बाज व पारंपारिक पेहराव या थीम असलेल्या मॅटर्निटी फोटोशूटचा ट्रेंड रायगड जिल्ह्यात सध्या वाढतांना दिसत आहे. असे वडखळ येथिल फोटोग्राफर निखिल भोईर यांनी सांगितले. तसेच हा फोटोशूट खेडेगाव, कौलारू जुने घर, वाडा, त्या भोवतीचा निसर्ग, तलाव, समुद्र शेत, जुनी मंदिरे आदी ठिकाणी करण्याकडे कल अधिक आहे. त्यामुळे अशा स्वरूपाची ठिकाणे जिल्ह्यात सहज उपलब्ध असल्याने मॅटर्निटी फोटोशूट साठी जिल्ह्यासह मुंबई-पुण्याकडील लोक रायगड जिल्ह्याला पसंती देतांना दिसत आहेत. यातून पारंपरिक व ग्रामीण संस्कृतीची जोपासना व प्रचार देखील होतांना पहायला मिळत आहे. तसेच असे फोटोग्राफी करणार्या फोटोग्राफरना मागणी देखील आहे.
पारंपरिक पेहराव व खाद्यपदार्थ
या फोटोशूट साठी होणारे बाबा धोतर व पंचा, झब्बा लेंगा परिधान करतात तर होणारी आई नववारी साडी आणि पारंपरिक आभूषणे परिधान करते. यावेळी तिच्या हातात चिंच, आवळा किंवा कैरी दिली जाते. तसेच कळसी, टोपली, बाळाचे बूट, कपडे आदी साहित्य बाजूला ठेवले जाते. काहीजण पाच्छात्य पेहराव ज्यामध्ये गाऊन व सूट घालतात. तर काही विविध चित्र व वाक्य असलेले टीशर्ट आदी विविध पेहराव देखील घालतात.
खर्च आवाक्यात
आवश्यकता असल्यास मेकअप आर्टिस्ट लागतो.
जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा प्रकारचे वातावरण आणि परिसर असल्याने दूर कुठे फोटोशूटसाठी जाण्याची आवश्यकता देखील भासत नाही. त्यामुळे सुरक्षित, कमी खर्चात व सोयीनुसार फोटोशूट होते. विशेष म्हणजे अशा फोटोशूटसाठी महागडे लोकेशन व कपडे याची गरज नाही. अवघ्या 12 ते 20 हजार रुपयांत हे शूट होते. अशा असंख्य कारणांमुळे देखील या शूटला मागणी वाढत आहे. पारंपरिक पेहराव व ग्रामीण संस्कृती पाहून इतर लोकांना ही ते खूप भावात आहे. परिणामी होणारे आईबाबा अशा फोटोशूटला पसंती देतांना दिसत आहेत.
परदेशात या फोटोशूटचे ट्रेंड आहे. मात्र याला पारंपरिक रूप देण्याचा प्रयत्न करत आहे. आपली पारंपरिक व ग्रामीण संस्कृती सर्वांना समजली पाहिजे. या उद्देशाने ही संकल्पना राबवित आहे. आणि त्यास मागणी देखील वाढली आहे. मात्र फोटोग्राफरचे कसब आणि कौशल्य आवश्यक आहे. आगामी काळात स्त्रिया घरात करत असलेली कामे, नवरा घेत असलेली काळजी आदी थीमवर काम करणार आहे.
सिद्धेश भोसले, फोटोग्राफर,
काही दिवसांपूर्वी मी मॅटर्निटी फोटो शूट केले आहे. त्याआधी मी फोटोग्राफर शोधत होतो. सिद्धेश भोसले यांना भेटलो व त्यांना मला हवी असलेली वेस्टर्न लुक ची कल्पना सांगितली. पण त्यांनी मला त्यांच्याकडे असलेली पारंपरिक लुकची कल्पना सांगितली. ती आम्हाला पटली व आम्ही पारंपरिक पद्धतीने फोटोशूट केले व ते इतके सुंदर झाले की मला खूप छान छान प्रतिक्रिया मिळाल्या. शिवाय बजेटमध्ये फोटोशूट झाले.
दर्शन जाधव, फोटोग्राफर