| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, सिडको तसेच विविध आस्थापनांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर गवताचे साम्राज्य वाढल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. हे रस्त्यावर वाढलेले गवत संबंधित आस्थापनाने ठेकेदाराच्या माध्यमातून काढण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
उरण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेले बहुतांशी रस्ते हे उरणच्या पूर्व विभागाशी जोडलेले आहेत. उरण-पनवेल मार्ग, चिरनेर-आवरे मार्ग, खोपटा-केळवणे मार्ग या मार्गावरील रस्त्यावरील दोन्ही बाजूला साईटपट्टीवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. हे गवत एवढे वाढले आहे की गवताने अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता व्यापला आहे. गवत वाढल्याने रस्ता पूर्ण आखूड झाला. त्यामुळे त्या रस्त्यावर दोन वाहने पास होणे मुश्किल झाले. तसेच समोरून येणारे वाहन या वाढलेल्या गवतामुळे दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच द्रोणागिरी नोड परिसरातील बहुतांशी रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. या गवतामुळे अपघात ही होण्याची संभावना नाकारता येत नाही, त्यामुळे या मार्गांवरील गवत लवकरात लवकर छाटण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी ठाकूर यांनी केली आहे. यासंदर्भात सिडकोच्या आस्थापनाकडे विचारले असता त्यांनी कामे सुरू असल्याचे सांगितले.
ठेकेदाराला रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढण्यासाठी सांगितले आहे. लवकरच हे काम सुरु केले जाईल.
– नरेश पवार, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम