ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात? पुन्हा ठाकरे – शिंदे गटात लढाई

। मुंबई । वृत्तसंस्था ।

विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला आहे. ऋतुजा या मुंबई महानगरपालिकेत कर्मचारी असून त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय त्यांना निवडणुकीचा अर्ज भरता येणार नाही.

कुरघोडीचे राजकारण करत शिंदे गटाने शिवसेनेला निवडणुकीच्या आधीच खिंडीत गाठले आहे. शिवसेनेपुढील अडचणी वाढतच आहेत. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून महाविकास आघाडीने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. मात्र ऋतुजा या मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरीतील के पूर्व कार्यालयात कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.

मात्र आता त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून शिंदे गटाने थेट आयुक्तांवर दबाव टाकला असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. तसेच शिंदे गटाकडून लटके यांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर यासंदर्भात ठाकरे गट न्यायालयात धाव घेणार आहे.

दरम्यान, महानगरपालिकेच्या सेवाशर्ती नियमावली १९८९ नुसार एखाद्या व्यक्तीला स्वेच्छानिवृत्ती हवी असेल तर तीन महिने आधी नोटीस द्यावी लागते आणि राजीनामा द्यायचा असेल तर एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. एक महिन्याची नोटीस नाही दिली, तर एक महिन्याचे मूळ वेतन जमा करावे लागते असा उपनियम आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी के पूर्व विभागातून ना हरकत मिळवली असून मूळ वेतनाची ६७ हजार ५९० रुपये ही रक्कम महानगरपालिकेच्या कोषागारात भरण्यात आल्याचे असल्याचे समजते. मात्र ऋतुजा यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Exit mobile version