कोट्यवधींचा नाला निधी ‘पाण्यात’; अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
| धाटाव | प्रतिनिधी |
गेल्या पाच दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीला (एमआयडीसी) जलमयतेचा मोठा फटका बसला आहे. वसाहतीमधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, पावसाळ्यापूर्वीच येथील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून एका मोठ्या नाल्याचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच मोठ्या पावसात हा संपूर्ण खर्च पाण्यात गेला असून, या नवीन नाल्याचा परिसराला काडीमात्र उपयोग झालेला नसल्याचे गेली चार दिवस तुडुंब झालेल्या रस्त्यावरील पाण्यामुळे दिसून आले आहे. वसाहतीतील कारखानदारांसह कामगारांना सुद्धा तुडुंब पाण्याचा चांगलाच फटका बसला असून, येथील जबाबदार अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
औद्योगिक वसाहती अंतर्गत रस्त्यावर काही ठिकाणी झाडे आहेत. मात्र, या झाडांच्या फांद्या पावसाआधी काढलीच नसल्याने सर्व झाडाची झुडपे ही अर्ध्या रस्त्यावर आल्यामुळे वाहनचालकांसह दुचाकी, सायकलस्वारांना रहदारीला अडचणीची ठरत आहेत. बहुतांशी ठिकाणी रस्त्यावरील दिवे बंद अवस्थेत असल्यामुळे आणि रस्त्यावरील झुडपांमुळे अनेक अपघात घडले आहेत. दरम्यान झालेल्या अपघातात अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले असून, काहींना कायमचे अपंगत्व आल्याचे समजते. मात्र, संबंधित अधिकारी वर्गाला याबाबत कशाचेही सोयरसुतक नसल्याचे पहावयास मिळत आहे.
रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी साचल्यामुळे कामगारांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागला आहे. अनेक लहान-मोठी वाहने पाण्यात बंद पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. काही कारखान्यांच्या आवारात आणि गोदामांमध्येही पाणी शिरल्याने कच्चा माल आणि यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अब्जावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन प्रक्रियेला या जलमयतेमुळे मोठा ब्रेक लागला आहे. रस्त्यावरील सांडपाण्याच्या चेंबरचे पाणी सुद्धा या पावसाच्या पाण्यात बहुतांशी ठिकाणी मिश्रित झाल्यामुळे अनेकांना याच पाण्यातून वाट काढत प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला तर अनेकांना पाण्यामुळे अंगावर खाज सुटल्याचे प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. सर्वत्र पसरलेल्या रंगीबिरंगी पाण्यामुळे औद्योगिक वसाहतीला बकालपणा आल्याचेही समोर आले. या कारखान्यातील पाणी त्या कारखान्यात गेल्यामुळे अनेकांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.
नियोजनशून्य कारभाराचा फटका
रोहा औद्योगिक वसाहतीतील स्थानिक उद्योजक आणि कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात रस्ते खाली आणि नाले उंच अशी अत्यंत विचित्र आणि चुकीची तांत्रिक दुरावस्था निर्माण झाली आहे. नाल्याची उंची रस्त्यांच्या पातळीपेक्षा जास्त ठेवल्यामुळे रस्त्यावरील साचलेले पाणी नाल्यात जाण्याऐवजी तुडुंब वाहणाऱ्या नाल्यातील पाणीच रस्त्यावर साठून राहत आहे. अभियांत्रिकीचा कोणताही ताण न घेता केलेल्या या नियोजनशून्य कामामुळे आज संपूर्ण औद्योगिक वसाहतीला याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.







