बिल मंजुर करण्यासाठी घेतली 10 हजारांची लाच
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परीषदेच्या रोहायेथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यरत शाखा अभियंता भोजवंत शिंदे याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहात पकडले. प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी शिंदे याने 10 हजारांची लाच स्वीकारली.
तक्रारदार यांचे शेणवई येथील सामाजिक सभागृहाच्या कामाचे बिल बांधकाम विभागात प्रलंबित होते, ते बिल काढण्यासाठी शाखा अभियंता भोजवंत शिंदे यांनी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अलिबागच्या कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार या विभागाच्या डीवायएसपी सुषमा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली आज सापळा रचण्यात आला .10 हजार रुपये लाच स्वीकारताना भोजवंत शिंदे यांना दिनांक आज दुपारच्या सुमारास अटक करण्यात आली .
या कारवाईत सुषमा सोनावणे यांच्यासह अरुण करकर, विनोद जाधव, महेश पाटिल ,जितेन्द्र पाटील, आटपटकर या पोलीस अधिकारी , कर्मचारयांनी भाग घेतला. रोहा तालुक्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे .रोहा पंचायत समिती, रोहा भूमी अभिलेख नंतर आता बांधकाम विभाग हे लाचखोरीच्या यादीत समाविष्ट झाले आहे.