| अलिबाग | प्रतिनिधी |
कोलाड येथील तिसे गाव येथे रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यात गोळी मारून त्याला ठार केले. या घटनेने रायगड पोलिसांनी मारेकऱ्याविरोधात शोध मोहिम सुरु केली असून त्यासाठी सात पथके तयार केली आहेत.
खूनप्रकरणी घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या नाल्यामध्ये तसेच रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला कोलाड येथील महेश सानप यांची रेस्क्यू टीम, आपत्ती व्यवस्थापन, डॉग स्कॉड पथक, बाँम्ब शोध पथकाच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. चंद्रकांत सटु कांबळे असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. रोहा तालुक्यातील पाले बुद्रूक येथील ते रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षापासून हा कर्मचारी रेल्वेमध्ये नोकरीला होता. कोलाड रेल्वे स्थानक अंतर्गत गेट नं. चारमधील तिसे येथे तो पॉईंट्समन म्हणून काम करीत होता.
21 ऑगस्ट रोजी दुपारी केबिनमध्ये असताना दुपारच्या दरम्यान अज्ञातांनी बंदूकीच्या गोळीने त्यांना ठार केले. गोळी डोक्यात लागल्याने ते जागीच मृत पावले. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह जिल्ह्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सीक टीम, डॉग स्कॉड, बॉम शोध पथक, फिंगर एक्स्पर्ट आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सात पथके वेगवेगळ्या दिशेला पाठविण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, वेगवेगळ्या खबऱ्यांकडून माहिती घेऊन पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरु केला आहे. तसेच मंगळवारी रेल्वे स्थानकाजवळील परिसरात शोध मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.