| खांब | वार्ताहर |
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. पावसाळ्यात महामार्गावर दरवर्षी पडणारे खड्डे सार्यांची डोकेदुखी ठरत आहे. यावर्षीच्या पावसामुळे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी व वाहनचालक हैराण झाले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने तसेच काही भागात वाहन चालवताना थांबावे लागत असल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून, वेळ, पैसा व इंधनाचाही अपव्यय होताना दिसत आहे. एक तासाच्या प्रवासासाठी अडीच ते तीन तास लागत असल्याने याचा नाहक त्रास प्रवासी व वाहनचालकांना सोसावा लागत आहे.