‘ट्वेन्टी-20 विश्‍वचषका’साठी रोहित कर्णधार

| राजकोट | वृत्तसंस्था |

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या आयोजित केल्या जाणार्‍या ट्वेन्टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी बुधवारी (दि.14) सांगितले. गेल्या काही काळापासून हार्दिक पांड्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद भूषवत होता. मात्र, एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाची ‘आयसीसी’ जेतेपदाची दशकभरापासून प्रतीक्षा आणखी लांबली. ही प्रतीक्षा संपवण्यासाठी यंदा रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ट्वेन्टी-20 विश्‍वचषकात खेळण्याची शक्यता बळावली होती.

राजकोट येथे झालेल्या एका समारंभात बोलताना शहा यांनी रोहित या स्पर्धेसाठी कर्णधार राहणार असल्याचे स्पष्ट केले. ”एकदिवसीय विश्‍वचषकात पराभव पत्करावा लागला असला, तरी आता रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ट्वेन्टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावून परत येईल,” असे शहा यांनी सांगितले. भारत-इंग्लंड तिसर्‍या कसोटीच्या पूर्वसंध्येला सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमचे नामकरण निरंजन शहा स्टेडियम असे करण्यात आले. या सोहळ्यात शहा बोलत होते. सोहळ्यासाठी सुनील गावस्कर, अनिल कुंबळे, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह रोहित, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आदी खेळाडू उपस्थित होते.

Exit mobile version