| रायगड | खास प्रतिनिधी |
कर्मचाऱ्यांच्याच चुकीमुळे आरोग्य विभागातील अन्य कर्मचाऱ्यांना पगारापासून वंचित राहावे लागले आहे. काम करूनही वेळेवह पगार न झाल्याने मात्र कर्मचारी चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यातून लवकर मार्ग निघाला नाही तर कर्मचाऱ्यांची आंदोलन करण्याची धारणा झाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांचे दोन ते तीन महिन्यांचा पगार रखडला आहे. साधारणतः महिन्याच्या 1 तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात येतो. यासाठी आधीच्या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार बँकेत जमा करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र पगार काढणारे कर्मचारी सक्षम नसतील तर काम करुनही वेळेवर पगार होण्याची आशा धुसर होते.
अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच अन्य कारणासाठी विविध बँकाचे कर्ज घेतले आहे. वेळेवर हप्ते जात नसल्याने कर्जाची रक्कम थकली आहे. त्यासाठी बँकांकडून दंड वसुली सुरू झाली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. वेतनासाठी दरमहा सरकारकडून जे अनुदान दिले जाते ते देखील वेळेवर पोचले आहे असे असताना कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागात तालुका आरोग्य अधिकारी पदापासून त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कायम व हंगामी वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी , सफाई कामगार मिळून सुमारे एक हजार कर्मचारी, अधिकारी आहेत. त्यांना पगार न मिळाल्याने त्यांची अडचण झाली आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुनील तटकरे, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले यांची भेट घेवून ही बाब त्यांच्या कानावर घातली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. रायगड जिल्हा परिषदेमध्ये या आधी देखील वित्त विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याच्या घटना घडल्या आहेत. आता त्याचा फटका आरोग्य विभागाला बसला आहे.