पुढील आठवड्यात कारवाईला सुरुवात
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यात सुमारे दोन लाख लिटर दुधाचे उत्पादन घेतले जाते, तसचे पर जिल्ह्यातून तब्बल पाच लाख लिटर दुधाची आयात केली जाते. सध्या बाजारात येणारे दुध भेसळ युक्त असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दुधातील भेसळ रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात दुग्ध विकास अधिकारी यांच्या स्तरावर भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये धाडसत्र सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा दुग्धविकास अधिकारी सुदर्शन पाडावे यांनी कृषीवलशी बोलताना दिली.
राज्यातील नागरिकांना चांगल्या प्रतीचे दुध प्राप्त व्हावे, तसेच भेसळ युक्त दुधामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी राज्यभरात दुधभेसळ रोखण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत राज्यातील सरकारी, खासगी दुध डेअरी, किरकोळ दूध विक्रेते, चिलिंग युनिट, दुध संकलन करणारी केंद्रे आदींमध्ये दुधाची तपासणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातही सदरची मोहिम पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे.
दुग्ध विकास अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामध्ये दुग्ध विकास अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, पशु संवर्धन उपायुक्त यांचा समावेश करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याची रोजची दुधाची गरज तब्बल सात लाख लिटर आहे. पैकी पाच लाख लिटर दुध हे पर जिल्ह्यातून आयात केले जाते, तर दोन लाख लिटर दुधाचे उत्पादन हे जिल्ह्यातच होते. बहुतांश दूध हे आयात केले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील दुध विक्री केंद्रावर धाड टाकून तेथील दुधाचे नमूने गोळा केले जाणार आहेत.
दुधात भेसळ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर विशेष करुन बालकांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. हे मानवी आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अचानक धाट टाकण्यात येणार आहे. तेथील नमुने गोळा करुन ते राज्य प्रयोग शाळेत पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये दोषींवर कारवाई करण्याचे अधिकार हे अन्न व औषध प्रशासनाकडे असणार आहेत. याकडे पाडावे यांनी लक्ष वेधले.