| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरुषांच्या खुल्या गटाची टी -ट्वेन्टी प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धा सध्या पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सुरू आहे. स्पर्धेतील पहिल्या पात्रता फेरीच्या सामन्यात, समीरा हैबिटेट्स अलिबाग जेट्सच्या संघाने दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यासाठी धडक दिली आहे. पहिल्या पात्रता फेरीच्या सामन्यात समीरा हैबिटेट्स अलिबाग जेट्स संघाने टीआयपीएल पनवेल किंग्स संघावर 7 गडी राखून दिमाखात विजय मिळवला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत अलिबागच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून भेदक गोलंदाजी करत पनवेलच्या संघाला 13 षटकात सर्व गडी बाद अवघ्या 54 धावत गुंडाळले. अलिबागच्या संघाकडून जलदगती गोलंदाज अभिषेक खातू , मिहीर भाटकर यांनी प्रत्येकी तीन, आर्यन खारकर दोन तर रितेश नलावडे व श्रीकांत मोलगी यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला तंबूत धाडले. पनवेल संघाकडून निहांशू करण 17 व विशाल जितेकर यांनी 17 धावांचे योगदान संघाला दिले. प्रतिउत्तर देताना अलिबागच्या संघाने विजयासाठी हव्या असलेल्या 55 धावा अवघ्या 7 व्या षटकांमध्ये तीन गडी गमावत पूर्ण केल्या त्यामध्ये श्रेयस कुमार यांनी सर्वाधिक नाबाद 21 तर कर्णधार ऋषिकेश राऊत यांनी 17 धावा संघासाठी काढल्या. पनवेल संघाकडून विशाल जितेकर यांनी दोन तर संकेत रानडे यांनी एक फलंदाज बाद केला. सामन्याचा सामनावीर म्हणून अभिषेक खातू याला गौरविण्यात आले असून, सामना पाहण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सहसचिव जयंत नाईक यांच्या क्रिकेट प्रेमी लोकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. आज स्पर्धेचा एलिमिनेटरचा सामना पेण बाप्पा विरुद्ध के.थ्री वॉरियर्स ह्या संघामध्ये होणार आहे.
समीरा हैबिटेट्स अलिबागची अंतिम फेरीत धडक
