संदिप पांचाळ यांचा आमरण उपोषणाचा इशारा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्ती व नुतनीकरण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, याप्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थ संदिप नारायण पांचाळ यांनी दिला आहे. तसे पत्र त्यांनी उपविभागीय अधिकारी राजापूर यांना दिले आहे.
कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्ती व नुतनीकरणासाठी 18 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. सन 2018 साली या कामाची सुरूवात करण्यात आली. मात्र सन 2021 साल उजाडले तरी हे काम पुर्ण झाले नाही. शिवाय दुरूस्ती करताना जुन्या इमारतीच्याच खिडक्या व दरवाजे लावण्यात आले असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप संदिप पांचाळ यांनी केला आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट कामाबाबत आपण ग्रामसभेत विचारणा केली असताना उपसरपंच पंढरीनाथ मयेकर यांनी कबुली देवून पूर्वी झालेल्या चुकांची दुरूस्ती करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसा ठरावही ग्रामसभेत करण्यात आला आहे. मात्र या घटनेलाही महिना उलटला असून प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अपुरे असून निकृष्ट साहित्य जैसे थे असल्याचे पांचाळ यांनी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version