। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
‘मी मंत्री झालो तर काहींच्या पोटात दुखू लागले आहे. वाढदिवस, मेळावे वगैरे घेऊन आमच्याविरोधात बोलले जात आहे. मेळावे वगैरे घ्यायचे असतील तर जरुर घ्या. मात्र, आमच्या नादाला लागाल तर सोडणार नाही’, असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना दिला आहे. तसेच, ’आमच्यातला शिवसैनिक आजही जिवंत आहे, त्यामुळे जरा जपून,’ असा इशाराही शिरसाट यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळात नियु्क्ती केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाची जबाबरदारीही दिली आहे. त्यामुळे शिरसाट यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. यावेळी बोलताना शिरसाट यांनी राजकीय विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. ते म्हणाले, ’निवडणुकीच्या काळात मला पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. मी कसा पराभूत होईल, यासाठी अनेकांनी डाव रचले. पण त्यांचे डाव मी उधळून लावले. मी मंत्री झालो तर काहींच्या पोटात दुखू लागले आहे.’ तसेच, ’वाढदिवस मेळावे वगैरे घेऊन आमच्याविरोधात बोलले जात आहे. मेळावे वगैरे घ्यायचे असतील तर जरुर घ्या. मात्र, आमच्या नादाला लागाल तर सोडणार नाही’, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.