| पाली । वार्ताहर ।
नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुर्तीकारांटी प्रतिष्ठापनेची तयारी सुरु झाली आहे. कोरोना संकटानंतर प्रथमच गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त होणार असल्याने भक्तांनी विशेषत: महिला वर्गाने तयारीवर भर दिला आहे. अनेक मंडळांची मूर्ती ठरवण्यापासून ते अन्य तयारीसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मागील 15 दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी ढगफुटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका मूर्तीकारांना बसत असून मूर्तीकाम व रंगकामात अडथळा येत आहे. सध्या बहुतांश मूर्तींच्या फिनिशींग तसेच रंगकामाची लगबग सुरु आहे. रंगाचा पहिला हात मारुन तो सुकल्यावरच अखेरचा हात मारला जातो. मात्र, वातावरणातील बदलामुळे अचानक मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी सुकण्यासाठी ठेवलेल्या मूर्ती पुन्हा प्लास्टिकच्या आवरणात ठेवाव्या लागत असल्याने मूर्तीकारांची धांदल उडत आहे.
नवरात्रोत्सव म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. नवरात्रोत्सवातील देवीची उपासना,धार्मिक कार्यापासून विसर्जनापर्यंत अनेक जबाबदार्या महिला पार पडतात. घरोघरी होणार्या घटस्थापनेतही महिलांच पुढाकार घेतात. त्याचबरोबर प्रत्येक वारानुसार शुभ असलेल्या रंगाचीच साडी देवीला नेसवली जाते असून रंगांचे अनुकरण महिलाही करतात. त्यामुळे नवरंगातील साड्या व ड्रेस खरेदी केली जाते. नवरात्रोत्सव जवळ आल्याने महिलांमध्ये नवरंगांची उत्सुकता वाढली आहे. बाजारपेठेही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सज्ज होवू लागली आहे.
कुशलता लागणार पणाला
मूर्तीच्या चेहर्यावरील भाव, डोळ्यातील तेज या गोष्टींसाठी मूर्तिकाराचे कसब कामी येत आहे. मूर्तींचे फिनिशिंग करणे, रंगरंगोटी करणे, सुशोभीकरण व अलंकारांसाठी कुंदण मोतीकाम करणे आदि कामांसाठी पाली शहारातील मूर्ती कारखान्यात लगबग सुरु झाली आहे. नवरात्रोत्सव सुरु होण्यास फक्त सात दिवस उरल्याने देवी मातेच्या मूर्तिकामाला वेग आला आहे. मूर्तीच्या रंगकामासह इतर बारीक सारीक गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे लागत असल्याने कारागीर सहकुटुंब रात्रंदिवस कार्यशाळेत राबू लागले आहे. त्यांच्या मूर्तिकलेच्या नैपुण्यामुळेच मातेच्या विविध रूपांमध्ये जिवंतपणा येणार आहे.