| चिरनेर | प्रतिनिधी |
मूर्ती कलेचे गाव म्हणून उरण तालुक्यातील चिरनेर कलानगरची ओळख आहे. अनेक अडचणी आणि समस्यांना सामोरे जात गेल्या आठ ते दहा पिढ्यांपासून येथील मूर्तिकार आपली मूर्ती बनवण्याची कला जपत आले आहेत. त्यांनी यावर्षी देखील गणपतीच्या सुमारे शेकडोहून अधिक मूर्ती तयार करून त्या विक्रीसाठी इतरत्र पाठविल्या आहेत. मात्र, गणेश मूर्ती घडविणारे मूर्तिकार सध्या संकटाच्या सावटाखाली वावरत आहेत.
चिरनेर गावात प्रामुख्याने, कलानगरामध्ये कुंभार समाजाची एकत्रित अशी वस्ती आहे. प्रत्येक कुटुंबात घरातच मूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. हे कलाकार विविध प्रकारची कलात्मक भांडी तसेच गणेश मूर्ती तयार करून आपल्या कलेचा व्यवसाय चालवित असतात. त्यामुळे या समाजाला मातीकामातून मूर्तिकला साकारणे ही मिळालेली दैवी देणगी आहे. मात्र, या कुंभार समाजाला कलेच्या बाबतीत अनेक समस्यांतून जावे लागत आहे. जागेसह रंग, माती, आणि इतर साहित्यांच्या वाढत्या दरामुळे हा व्यवसाय भांडवली स्वरूपाचा झाला आहे. त्यामुळे त्यांना हा व्यवसाय करण्यासाठी भांडवला अभावी मोठी आर्थिक अडचण येत आहे. येथील उत्कृष्ट रंगसंगती, भावमुद्रा, सजीवपणा दर्शविणारी आखणी अशी चिरनेर कलानगर येथील गणेश मूर्तींची खासियत आहे. परंतु, बाहेरील पीओपी गणेश मूर्तींच्या आक्रमणामुळे येथील मातीच्या गणेश मूर्तींच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याचे येथील मूर्तिकारांकडून सांगितले जात आहे. तसेच, चिरनेर सारख्या ग्रामीण भागातील मूर्तिकारांना शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, बँकांनी अर्थसहाय्य करावे, तरच येथील मूर्तीकला अस्तित्वात राहील, असे देखील येथील मूर्तिकारांकडून बोलले जात आह






