माथेरानमध्ये सेमी इंग्रजी सुरू होणार

| माथेरान | प्रतिनिधी |

माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल शाळेत गुरुवारी (दि.3) शिक्षक, पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षक सचिन भोईर यांनी पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले. शिक्षक लक्ष्मण ढेबे, साक्षी कदम, अमोल अंधारे, मनीषा चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तशीरपणाबाबत पालकांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे आवर्जून सांगितले. शिक्षक समिती सदस्य प्रतिभा घावरे यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पालकांनी वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे व आपल्या मुलांमध्ये गुणवत्ता भरपूर आहे, त्यांना प्रत्येक क्षेत्रात आपल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी संधी दिली पाहिजे, असे सांगितले.

त्यानंतर शिक्षण समितीचे सभापती सुनिल शिंदे यांनी पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाचे प्रचंड आकर्षण असल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना विद्यार्थी संख्येचा प्रश्न नेहमीच भेडसावीत आहे. यावर सेमी इंग्रजी हाच एकमेव उत्तम पर्याय ठरू शकतो, जेणेकरून सर्वसामान्य पालक वर्ग आपसूकच आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, इंग्रजी शिकवण्यासाठी माथेरान नगरपरिषद शाळेत प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करणार असून पहिलीच्या वर्गापासून सेमी इंग्रजीला सुरवात होणार असल्याचेही सुनिल शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Exit mobile version