। अलिबाग । प्रतिनिधी ।
ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे संरक्षण करावे. शक्यतो बक्षीसपत्र जिवंतपणी करून नये व इच्छापत्र करावे. कारण त्याची अंमलबजावणी मृत्यू पश्चात होते. त्यांना त्यांच्या स्थावर व अस्थावर मालमत्तेतून कोणीही बेदखल करू शकत नाहीत, असे मौलिक मार्गदर्शन मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी केले आहे.
अलिबाग येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार) व सीएसएससी रिजनल रिसोर्स सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक जनजागृती कार्यक्रम सँडी कॉटेज येथील सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. या जनजागृती शिबिरात कायदे विषयक मार्गदर्शना बरोबरच इतर विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमात अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण व त्यांच्यासाठी असलेल्या कायद्या विषयी मार्गदर्शन केलेे. अलिबाग मधील प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. जयंत चेऊलकर यांनी सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन केले. आयुष्य जगताना काही महत्त्वाच्या बाबी खूप महत्त्वाच्या असतात. त्या विषयी तिसर्या सत्रामध्ये आयुष मंत्रालय यांचे अधिकृत प्रशिक्षक समरेश शेळके यांनी आपले विचार मांडले. अमिषा भगत योग प्रशिक्षक यांनी शरीराला व मनाला होणारे योगाचे फायदे व महत्त्व सांगितले. तसेच, पोलीस नेहमीच आपल्या सेवेसाठी तत्पर असतात म्हणून ज्येष्ठांनी देखील सदैव सतर्क राहून पोलिसांच्या सामाजिक उपक्रमात भाग घेऊन मदत केली पाहिजे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत फार्णे यांनी सांगितले.