महिलांना डवरे खोदून पाणी भरण्याची वेळ; पाझर तलावामध्ये भरपूर पाणी असूनही वणवण
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतीमधील गावंड वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर पाझर तलाव आहे. मात्र, तलावाची साफसफाई अनेक वर्षे करण्यात आली नसल्याने पाण्याचे झरे बंद झाले आहेत. त्यामुळे पाझर तलावाच्या खाली असलेल्या विहिरी कोरड्या झाल्या आहेत.दरम्यान, जलजीवन मिशनमधील नळपाणी योजनेचे काम दोन वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे महिलांना डवरे खोदावे लागले आहेत.
गावंड वाडीमधील वस्ती 60 घरांची असून, या वाडीच्या खालील बाजूस एक किलोमीटर अंतरावर पाझर तलाव आहे. या पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठादेखील आहे. या पाझर तलावाच्या खालील बाजूस काही विहिरी असून, त्यातील पाणी गावंड वाडी ग्रामस्थ यांना पिण्यासाठी मिळत होते. तेथील एका विहिरीवर पंप लावून पाणी वाडीपर्यंत आणले आहे. मात्र, पाझर तलावाची साफसफाई जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने केलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात दगड, माती येऊन तलाव गाळाने अर्धा भरला आहे.त्याचवेळी गाळ काढण्यात आला नसल्याने तेथे असलेले पाण्याचे झरे लोप पावले आहेत.त्यामुळे तलावातील पाणी अशुद्ध आणि हिरवेगार झाले आहे. त्याचवेळी पाझर तलावातील पाणी जमिनीमधून पाझरून जाण्याची प्रक्रिया गाळाने तलाव भरल्याने बंद झाली आहे.त्यामुळे तेथील विहिरी या कोरड्या पडल्या आहेत आणि त्यामुळे वाडीमध्ये असलेल्या टाकीमध्ये पाणी पोहोचत नाही.
त्यामुळे या वाडीमधील महिलांना तीव्र चढावाचा डोंगर उतरून पाणी आणण्यासाठी पाझर तलावाच्या खाली खोदलेल्या डवरे आहेत तेथे जावे लागत आहे. साधारण पाच ते सहा फूट खोल डवरा तेथे असून, एक महिला एकावेळी त्या डवर्यात उतरते आणि पाणी भरू शकते. अशा स्थितीत वाडीमधील महिलांचा संपूर्ण वेळ डवर्यातील पाणी भरण्यावर जात आहे. त्यामुळे महिलांना पाणी टंचाईने त्रस्त केले असून जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना गावंड वाडीसाठी मंजूर आहे. त्या योजनेसाठी वाडीमध्ये जलकुंभ बांधून वर्ष लोटले आहे. मात्र, अन्य कोणतीही कामे संबंधित योजेनेचे ठेकेदार यांनी पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे नळपाणी योजनादेखील कार्यान्वित होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी असलेल्या पाझर तलावाची दुरुस्तीदेखील शासनाने केली पाहिजे. तसेच नळपाणी योजना वेळेत पूर्ण करून गावंड वाडीमधील आदिवासी लोकांवर भरउन्हात पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ थांबेल.
येथील पाझर तलाव हा केवळ एका वाडीमधील पाणीप्रश्न सोडविणार नाही. तर आसपासच्या सहा वाड्यांचा पाणीप्रश्न सुटू शकेल. दुसरीकडे या तलावाची शासनाने तात्काळ दुरुस्ती करावी जेणेकरून तलावाच्या खालील बाजूस असलेल्या विहिरीमध्ये जमिनीत पाझरून पाण्याचा साठा होऊ शकतो.
प्रकाश केवारी,
ग्रामस्थ मोरेवाडी
नळपाणी योजनेची विहीर बांधून एक वर्ष झाले, पण अन्य कोणतीही कामे झाली नाहीत.त्यात विहीर ज्या ठिकाणी खोदली जात आहे, तेथे बर्याच विहिरी आटल्या असल्याने पाणी नाही. त्यामुळे आधी पाझर तलाव स्वच्छ व गाळमुक्त करावा, अशी मागणी आहे.
सुरेश भगत,
ग्रामस्थ







