| येवला | प्रतिनिधी |
माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला याची मी माफी मागतो, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि.8) येवलेकरांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी पहिली सभा छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात घेतली. या सभेत त्यांनी भुजबळांवर सडकून टीका केली.
पवार म्हणाले, या जिल्ह्यानं अनेक वर्षे पुरोगामी विचारांना साथ दिली. या नाशिकमधील शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, दुष्काळी भागातील शेतकरी असेल त्यांनी कधी सत्याची साथ सोडली नाही. इथल्या लोकांना आम्ही दिल्लीत जाण्याची संधी दिली. भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आम्हाला आवश्यकता होती, त्यामुळं आम्ही येवल्याची निवड केली. मी दिलेली नावं कधी चुकली नाहीत पण एका नावानं घोटाळा झाला. माझा अंदाज कधी चुकत नाही पण इथं माझा अंदाज चुकला. माझ्या निर्णयावर तुम्ही विश्वास ठेवला, त्यामुळं त्यामुळं जर त्रास झाला असेल तर मी तुमची माफी मागितली पाहिजे. त्यामुळेच मी इथं आलो आहे, असे ते म्हणाले.
हवी ती शिक्षा करा
माझं देशाच्या पंतप्रधानांना जाहीरपणे सांगणं आहे की, संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे. ती त्यांनी लावावी आणि आमच्यापैकी कोणी जर भ्रष्टाचारात सहभागी आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची असेल नसेल ती सगळी सत्ता वापरा, चौकशी करा, तपास करा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेलाय असं तुम्हाला वाटेल किंवा तुमचा तसा निष्कर्ष निघेल त्याला हवी ती शिक्षा द्या. त्यासाठी तुम्हाला आमचा पाठिंबा असेल, असेही पवारांनी सांगितले.
आव्हाडांचे आवाहन
याच सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी जर आमची अडचण वाटत असेल तर मी आणि जयंत पाटील हे दूर जातो, पण अजित पवारांनी परत यावे, असे आवाहन केले.