| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकरी विभागाचे अध्यक्ष अनिल ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम हटाओ सेनेने दि.17 ते 30 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आंदोलकांनी दि.17 ऑगस्ट रोजी “ईव्हीएम हटाव, मोदी हटाव”च्या घोषणा देत जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून असंख्य आंदोलक जंतर मंतरवर आले होते. चार दिवस सुरू राहिलेल्या या आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभला.
संविधानातील आर्टिकल 328चा उपयोग करून आपआपल्या राज्यांतील मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीत बॅलेट पेपरचा उपयोग करू शकतात. 2027 ला पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी इव्हीएम हटावो सेनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे. तसेच, ईव्हीएम हटवण्यासाठी प्रधानमंत्री आणि सर्व खासदारांना कोणत्याही इन्स्टाग्राम पोस्ट आणि सोशल मिडीयावरून संदेश पाठवावेत, असे आवाहन देखील ईव्हीएम हटावो सेनेने केले आहे. या आंदोलनात अनिल ढवळे यांच्यासह ईव्हीएम हटाओ सेनेचे शशांक आर्या, सचिन आर्या, सुधाकर लाड, नरेश भगत, विष्णू पाटील, मोहन गवंडी, जयेश पाटील, हर्षद पाटील आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.







