| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव नगरपंचायतीने घरपट्टी, नळपाणीपट्टी दुपटीने दरवाढ करण्याचा घेतलेल्या निर्णयाविरोधात तसेच डम्पिंग ग्राउंडचा ऐरणीवर आलेला प्रश्न, जुने माणगावकरांना अशुद्ध पाणी पुरवठा, प्लास्टिक पिशवी बंदी अशा विविध प्रश्नांविरोधात माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील ग्रामस्थ तथा पत्रकार सलीम मुबारक शेख हे 1 नोव्हेंबर 2022 पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. त्यांच्या या उपोषणास शेकापतर्फे आपला पाठिंबा असल्याचे माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे सभापती युवानेते निलेश थोरे व नगरपंचायतीच्या नगरसेविका ममता थोरे यांनी सांगितले. माणगाव नगरपंचायतीची माहे ऑक्टोबरची मासिक सभा 10 ऑक्टोबर रोजी नगरपंचायत कार्यालय माणगाव येथे झाली. या सभेत उपोषणाच्या नोटिसीचा विषय चर्चेत आल्यावर पाणीपट्टी कमी करण्यात येणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
जोपर्यंत दुपटीने वाढ केलेली पाणीपट्टी कमी करण्यात येत नाही. तसेच डम्पिंग ग्राउंडचा ऐरणीवर आलेला प्रश्न, प्लास्टिक पिशव्या बंदी यावर ठोस निर्णय व उपाययोजना होणार नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असून 1 नोव्हेंबरपासून आपण नगरपंचायत कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थ शेख यांनी दिला असून, तशा प्रकारची नोटीस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना 3 ऑक्टोबर रोजी देण्यात आली आहे. या उपोषणाची प्रत माहितीकरिता खा.सुनील तटकरे, आ.भरत गोगावले, आ.आदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, माणगाव प्रांताधिकारी, तहसीलदार, डीवायएसपी, नगराध्यक्ष, पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आले आहे. जोपर्यंत माणगावकरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या चर्चेला आपण येणार नसल्याचे शेख यांनी सांगितले आहे.