खंडाळ्यात शिंदेसेनेला दणका

उपसरपंचासह दोन सदस्य अपात्र; भाजपच्या कायदेशीर लढ्याला मोठे यश

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपचे तालुका मध्य सरचिटणीस ॲड. आशिष बाणे यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या अतिक्रमणविषयक अपात्रता प्रकरणात त्यांच्या कायदेशीर लढ्याला मोठे यश मिळाले आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल असलेल्या वाद अर्जांवर सोमवारी (दि.23) महत्त्वपूर्ण आदेश पारित करण्यात आले आहेत. या आदेशांनुसार खंडाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रभाकर तुणतुणे, सदस्य स्वाती चिंचकर आणि सुशील वेळे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे खंडाळे ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणाला मोठा धक्का बसला असून, शिंदे गटाला मोठा दणका मिळाला आहे.

ॲड. अशिष बाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय जमिनीवरील कथित अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून खंडाळे ग्रामपंचायतीतील सदस्यांविरोधात कायदेशीर लढा उभारण्यात आला होता. केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता शासकीय अभिलेख, कायदेशीर तरतुदी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हा लढा पुढे नेण्यात आला. तसेच, शिवसेना शिंदे गटाचे आमदार दळवी यांच्या समर्थकांचे सदस्य पद रद्द करण्यात यावे, यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज करण्यात आला होता. या प्रकरणात ॲड. आशिष बाणे आणि ॲड. दीपक नागे यांनी सातत्याने पाठपुरावा करत संबंधित प्राधिकरणासमोर आपली बाजू मांडली. अतिक्रमणाविरोधात केलेल्या या तक्रारीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. अखेर खंडाळे ग्रामपंचायतीतील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, खंडाळे ग्रामपंचायतीतील तीन सदस्यांच्या अपात्रतेच्या आदेशाने अलिबागच्या राजकारणात नवे वादळ निर्माण केले आहे. या घडामोडीमुळे शिंदे गटाच्या स्थानिक राजकीय वर्चस्वाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शिंदे गटाच्या स्थानिक राजकीय वर्चस्वाला मोठे आव्हान मिळाले असून, सोन्याच्या लंकेला आग लागल्याची राजकीय चर्चा आता तालुकाभर रंगू लागली आहे.

हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधातील वैयक्तिक संघर्ष नाही. हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायद्याचे राज्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यासाठीचा लढा आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात नियमांचे पालन झाले पाहिजे. शासकीय जमिनींचे संरक्षण झाले पाहिजे.कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, हीच आमची भूमिका आहे. राजकीय दबावापेक्षा कायदेशीर लढाईला महत्त्व देत मिळवलेले हे यश आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहे.

ॲड. आशिष अशोक बाणे
Exit mobile version