। मुंबई । प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे यांना भाजपाने विधानसभा निवडणूक 2024 नंतर सुद्धा मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळेच त्यांनी शिवसेना फोडली, असे ते खासगीत सांगत आहेत. मी खोटं बोलत नाही, तुम्हाला तसे वाटत असेल तर त्यांना जाऊन विचारा, असे राऊत म्हणाले आहे. मात्र, निवडणूक झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखे बाजूला केले गेले. यामुळे ते अजूनही धक्क्यात आहेत, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मनोभूमिकाचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातले सरकार हे बहुमतातले असले तरी ते एक संघ नाहीत. त्यात एक वाक्यता नाही. एकमेकांविरुद्ध कुरगुड्या कराचे प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करायची ताकद ज्याला बार्गेनिंग पॉवर म्हणतात, ती भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे संपवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातला एक सरपटणारा प्राणी झाला असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, एक तर 50, 55 जागा कशा मिळाल्या हा त्यांना पहिला धक्का आणि भाजप नेते अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळला नाही हा दुसरा धक्का. या दुःखाने ते पूर्ण कोलमडले आहेत. सरकारमध्ये पूर्णपणे त्यांची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून जो फोकस त्यांच्याकडे होता तो गेला आहे. लोकं आता त्यांच्याकडे जात नाही, जातात ते फक्त पैसे मागण्यासाठीच जात असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखे बाजूला केले गेले. काही मंत्रीपदं दिली, महत्त्वाची खाता दिली, उपमुख्यमंत्री पद दिले. मात्र, एकनाथ शिंदे यांचा चेहरा आपण पाहिला असेल, तर त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर मी काय म्हणतो ते तुम्हाला कळेल. ते अजूनही शून्यात आहेत आणि गुंगीत आहेत. ते धक्क्यातून सावरलेले नाहीत.
खा. संजय राऊत,
शिवसेना (उद्धव ठाकरे)
शिंदे गट फडणवीसांच्या नियंत्रणात
संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे की, एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या आमदारांमधील एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचे पूर्णपणे नियंत्रण आहे. शिंदे गटाच्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर त्यांचे नियंत्रण आहे. कारण देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून हे 20-25 लोक सुरतला गेले होते. एकनाथ शिंदे यांच्यासाठी ते गेले नाही. आजही त्यांच्यावर कंट्रोल फडणवीस यांचा आहे आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत. आपण पुन्हा मागे फिरायचे का? असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे. अशी माझी माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.