कर्जत तालुक्यातील शिवसेनेचा ठाकरेंना पाठिंबा

आ. थोरवे यांचे बॅनर आले खाली
| नेरळ | प्रतिनिधी |
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या कॅम्प मध्ये असल्यानंतर देखील सुरुवातीचे काही दिवस कर्जत विधानसभेचे आ.महेंद्र थोरवे यांच्या विरोधात कुठेही बॅनर लागले नव्हते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झालेल्या बंडखोरीबद्दल आपली भूमिका जाहीर केल्यानंतर कर्जत तालुक्यातील थोरवे यांचे बॅनर खाली आले आहेत. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारे बॅनर तालुकाभर झळकले असून ते बॅनर अनेक दिवस कोणत्याही कुरघोडी विना झळकत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत थोरवे हे देखील असल्याचे स्पष्ट झाले होते.त्या परिस्थितीत कर्जत आणि खालापूर तालुक्यात पुढील दोन दिवस शांतता होती आणि कोणतीही प्रतिक्रिया उमटत नव्हती,परंतु माथेरानमध्ये शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांनी फेसबुक पोस्ट द्वारे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठिंबा दिला. त्याचे पर्यवसान माथेरान मध्ये दोन गटात वाद झाले.तर दुसरीकडे कर्जत तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठिंबा देणारे फलक कर्जत नगरपरिषद मध्ये गटनेते नितीन सावंत यांनी संपूर्ण तालुकाभर लावले .तर नेरळ ग्रामपंचायत मधील पाच सदस्यांनी आणि कर्जत नगरपरिषद मध्ये शिवसेनेच्या जनतेतून निवडून आलेल्या सदस्यांनी देखील ठाकरे यांना पाठिंबा देणारे बॅनर लावले. त्यामूळे पहिले दोन दिवस एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले आमदार महेन्द्र थोरवे यांच्याबद्दल काहीही प्रतिक्रिया न देणारे शिवसेनेचे कार्यकर्ते यांची भूमिका संदिग्ध होती.

25 जून रोजी पनवेल येथे शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना नेते अनंत गीते, खा.श्रीरंग बारणे आणि जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील,जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत शिंदे गटात असलेले आणि पक्षाच्या प्रमुखांविरुध बंड पुकारून गुवाहाटी मध्ये असलेले सेनेच्या रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदार यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांचे दहन केले.त्या जिल्हा कार्यकारिणीत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना आव्हान देणारे रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदार यांचे शिवसेना नावाने लागलेले बॅनर काढून टाकावेत आणि त्यांनी स्वतःहून ते बॅनर न काढल्यास शिवसैनिक यांनी काढावेत असे आदेश देण्यात आले होते.त्या नंतर कर्जत तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर असलेले कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे बहुतेक बॅनर काढले गेले आहेत. त्यामुळे आता कर्जत तालुक्यातील पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठिंबा देणारे बॅनर दिसू लागले आहेत.मात्र शिंदे गट आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या गटात राजकीय धुमशान पुन्हा दिसू लागले असून कर्जत तालुक्यातील वातावरण दूषित होण्यापर्यंत हा वाद पोहचला आहे.त्यातून शिवसेना पक्षप्रमुख यांच्या बाबत ठाम भूमिका मांडणारे माथेरान शिवसेनेचं शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्या गाडीवर हल्ला करून सावंत यांना जबर मारहाण करण्यात आली होती.त्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले प्रसाद सावंत यांच्या हाता पायावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे पडसाद आणखी पुढे कोणत्या थरापर्यंत जाणार? हे लक्षात घेवून पोलीस दल सतर्क झाले आहे.

Exit mobile version