| महाड | प्रतिनिधी |
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर गुरुवारी (दि.2) शिवपुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने राज्यभरातून हजारो शिवभक्त आणि शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले होते. पहाटेपासूनच गडावर शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. शिवभक्तांनी शिवरायांच्या समाधीस्थळी अभिवादन करून त्यांना मानवंदना दिली. रायगडावरील हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.







