‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
हजारो शिवभक्तांची उपस्थिती
। रायगड । प्रतिनिधी ।
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 353 वा राज्याभिषेक दिन सोहळा शनिवारी (दि.27) दुर्गराज रायगडावर पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन कार्यरत असल्याचे सांगत रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोहयो मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकण कडा मित्र मंडळ रायगडचे अध्यक्ष रोहित पवार, उपाध्यक्ष संकेत वडके तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात दुर्गराज रायगडाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. रायगडावरील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजनेस तातडीने मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. तसेच, रायगडासह महाराष्ट्रातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त 12 ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर त्यांची कीर्ती वृद्धिंगत करण्यासाठी शासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

सोहळ्याच्या प्रारंभी रायगड पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना देण्यात आली. वैदिक मंत्रोच्चारांच्या वातावरणात पालखी सोहळा राजसदरेवर दाखल झाला. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ढोल-ताशांचा गजर, पोवाडे, लोकनृत्ये, युद्धकला सादरीकरणे, शिवप्रेमी पथकांचे आकर्षक कार्यक्रम आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर शिवमय झाला.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महावितरण तसेच विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून आरोग्य, पिण्याचे पाणी, वाहतूक, पार्किंग, सुरक्षा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.







