। पनवेल । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्यात सध्या शिक्षक मतदार आणि पदवीधर मतदारांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुणे विभागांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी शुक्रवारी (दि.23) मतदान होत आहे.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व समविचारी पक्ष तसेच शिक्षक संघटनांचे उमेदवार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांना शेकाप नेते व माजी आमदार बाळाराम पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षातर्फे जाहीर पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आणि बाळाराम पाटील या निवडणुकीत सक्रिय राहून दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या प्रचार करीत आहेत. या पुणे शिक्षक मतदार संघामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर असे एकूण पाच जिल्हे येत असून या पाच जिल्ह्यांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या जमाने काम करीत आहेत. दरम्यान, शेतकरी कामगार पक्ष नेहमीच विचाराच्या आणि न्यायाच्या लढाईत अग्रेसर राहिला आहे. यावेळी पुणे शिक्षक मतदार संघाच्या विचारांची आणि न्यायाच्या लढाईत शेकाप नेहमीच साथ देईल. मतदारांनी भरघोस मतांनी सावंत सरांना निवडून देऊन आपल्या हक्काचा माणूस निवडा, असे आव्हान कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी सांगितले.






