धक्कादायक! दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू

70 जण रुग्णालयात दाखल

। तामिळनाडू । वृत्तसंस्था ।

तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विषारी दारू प्यायल्याने एका रात्रीत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 70 हून अधिक व्यक्तींना उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल केले असून उपचार घेत असलेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात बुधवारी (दि. 19) रात्री अनेकांना उलट्या आणि इतर तक्रारी सुरु झाल्या. सर्व रुग्ण उपचारासाठी कल्लाकुरीची तसेच, विल्लुपुरम, सालेम आणि पुदुच्चेरी या भागातील रुग्णालयांमध्ये दाखल झाले. या रुग्णांची तपासणी केली असता त्यांनी विषारी दारू प्यायल्यामुळे त्यांना हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज रुग्णालयाकडून व प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे.

उपचार चालू असलेल्यातील काहींची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे उपचारादरम्यान आत्तापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यातही अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाचा तामिळनाडू पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून गोविंदराज उर्फ कन्नूकुट्टी (49) या व्यक्तीला अटक केली आहे. बेकायदेशीररीत्या दारू गाळून विकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून गोविंदराजकडून पोलिसांनी तब्बल 200 लिटर अरकचे कॅनही जप्त केले आहेत. या दारूचे नमुने तातडीने विल्लुपुरम येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यामध्ये विषारी मिथेनॉलचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी याबाबत कारवाई केली आहे.

Exit mobile version