। महाड । प्रतिनिधी ।
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक पाचाड गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईनचा तुटवडा आहे. त्यामुळे नागरिकांना अन्य दवाखान्यात पैसे खर्च करून जावे लागत आहे. यावरुन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या औषध पुरवठा विभागाकडून अल्प सलाईन पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. रुग्णसंख्या वाढली असताना महिनाभराकरिता केवळ 50 सलाईनचा पुरवठा केला जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या आरोग्य केंद्राचा फायदा पाचाड, रायगडवाडी, नेवाळी, हिरकणी वाडी, पुनाडे, सांदोशी, सावरट, कोंझर, कोथुर्डे, वाळसुरे, छत्री निजामपूर, मांडले आदी गावातील ग्रामस्थांना होते. या परिसरात खासगी दवाखाने नसल्याने गरोदर महिलांनादेखील प्रसूतीसाठी याच प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार होतो. मात्र गेली काही वर्षांपासून याठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वारंवार मागणी होऊनही याबाबत शासन स्तरावर दखल घेतली जात नाही. त्यामुळे स्थानिक रुग्णांना पदरमोड करून महाड शहरात उपचारासाठी यावे लागत असल्याची माहिती पाचाड येथील सामाजिक कार्यकर्ते अमर सावंत यांनी दिली. याबाबत पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राकडून महाड पंचायत समितीमधील तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना लेखी पत्रान्वये वाढीव औषधांची मागणी 3 ऑगस्टच्या पत्रान्वये केली आहे. मात्र याला अद्याप प्रतिसाद न मिळाल्याने रुग्णांचे मात्र हाल होत आहेत.
पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईन, औषधे उपलब्ध नसल्याने ऐन पावसाळ्यात उद्भवणार्या स्थितीला सामोरे जाताना नागरिकांना आणि वैद्यकीय अधिकार्यांना कसरत करावी लागत आहे. औषध तुटवड्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड देखील बसत आहे. यामुळे औषध पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे.
– लहू औकीरकर, स्थानिक नागरिक
गेली कांही दिवस रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे उपलब्ध औषध साठा अपुरा पडत आहे. याबाबत औषध पुरवठा करण्याबाबत मागणी केली आहे
– डॉ. सृष्टी शेळके, वैद्यकीय अधिकारी पाचाड