। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पेडली या छोट्याशा गावातील श्रद्धा साईनाथ तळेकर हिची टोकियो येथे पुढच्या महिन्यात होणार्या जागतिक जिम्नॅस्ट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मुलगा मुलगी एक समान असे मूल्य जोपासणारे वडील साईनाथ तळेकर आणि आई शितल तळेकर यांनी श्रद्धाचे अंगभूत क्रीडा कौशल्य ओळखून वयाच्या 8 व्या वर्षी काळजावर दगड ठेवून पदरमोड करून लेकीला ठाण्याला मामाकडे शिकायला पाठवले. तिथून तब्बल 20 वर्षे लेकीपासून दुरावा आहे. मात्र लेकीने जिम्नॅस्टिक खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके कमावत उत्तुंग कामगिरी बजावत देशाचे नावलौकिक करून आई-वडिलांचे पांग फेडले. शेतकरी असलेले साईनाथ तळेकर व गृहिणी शितल तळेकर यांची मुलगी श्रध्दा तळेकर. मोठा मुलगा दर्शन आणि मुलगी श्रद्धा. घरची परिस्थिती प्रतिकूल होती. कुटुंबाला या खेळाची कोणतीच पार्श्वभूमी नाही. त्यामुळे जिम्नॅस्टिक बद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. पण आपल्या मुलीला शिकवावे क्रीडा क्षेत्रात तिने काहीतरी करावे यासाठी काळजावर दगड ठेऊन साईनाथ व शितल तळेकर यांनी श्रद्धाला वयाच्या 8 व्या वर्षी ठाण्याला मामाकडे शिकायला पाठवले. तिथे तिने एक जिम्नॅस्टिक शिबिरात सहभाग घेतला. त्यानंतर अवघ्या काही वर्षात श्रद्धाने जिम्नॅस्टिक खेळातील चुणूक आणि कौशल्य दाखविले.