आक्षीच्या समुद्रकिनार्‍यावर ‘सी अ‍ॅनिमोन’चे दर्शन

दर्याच्या गर्भातील खजिना किनार्‍यावर

। अलिबाग । संतोष राऊळ ।

अथांग पसरलेला अरबी समुद्र, खळाळणार्‍या लाटा.. कधी आक्राळविक्राळ तर कधी हव्याहव्याशा वाटणार्‍या, अंगाला झोंबणारा कधी गार, तर कधी उष्ण असा वारा, लाटा येताना होणारी समिंदराची गाज… हे सारे डोळ्याचं पारणं फेडणारं सौंदर्य आपण नेहमीच पाहतो. पण, या समुद्राच्या तळाशीही असाच काही गुप्त खजिना लपलाय. तो पाहण्यासाठी अनेकदा दर्याच्या तळाशी जावं लागतं. पण, तोच खजिना किनार्‍यावर नजरेस पडला तर होणारा आनंद काही औरच असतो. असाच देखणा आणि मनाला मोहवून टाकणारा खजिना आक्षीच्या किनार्‍यावर आढळून येऊ लागल्याने निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता आणि कुतूहल निर्माण होऊ लागले आहे.


समुद्राने लाखो जीवांना आपल्या पोटात सामावून घेतलेले आहे. त्यातील काही जीवांची आपल्याला ओळखही नाही. तीच ओळख व्हावी म्हणूनच समुद्रकिनारी गेल्यावर रोज वेगवेगळे शंख शिंपले, मासे आढळत असतात. त्यातील काही जीवांशी आपली ओळख असते, पण काही जीव खूप अनोळखी असतात. असाच एक जीव (सी अ‍ॅनिमोन) अलिबागमधील आक्षी या समुद्रकिनारी आढळून आला. त्याचा पांढरा व जांभळा रंग मन वेधून घेणारा होता. समुद्राने आपल्या पोटातला अनमोल ठेवा असा किनार्‍यावर आणून ठेवला होता, पण सकाळी खूपजण समुद्रकिनारी चालण्यासाठी येत असतात, कोणीही कुतूहल म्हणूनही त्याकडे पाहिलंसुद्धा नाही. एखादा दुर्मिळ असा समुद्र जीव असेल तर त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. याची नोंद घेणं गरजेचे आहे. तसेच सर्वसामान्यांना त्याबद्दल माहिती पुरवणे गरजेचे आहे. तसे केल्यास पर्यटनाससुद्धा अधिकाधिक चालना मिळू शकते.

आक्षीच्या समुद्र किनार्‍यावरील सी अ‍ॅनिमोनचे छायाचित्र पुण्यातील डेक्कन कॉलेजचे प्रा. सतिश नाईक यांना पाठविण्यात आला होते. यावेळी त्यांनी हे छायाचित्र स्नेक लॉक्ड अ‍ॅनिमोन असल्याचे सांगितले. तसेच हा अ‍ॅनिमोन असल्याला दुजोरा दिला.

सी अ‍ॅनिमोन म्हणजे नेमकं काय?
सी अ‍ॅनिमोन हा शिकारी समूह आहे. त्याच्या रंगीबेरंगी दिसण्यामुळे, त्यांना ‘अ‍ॅनिमोन’ या पार्थिव फुलांच्या वनस्पतीचे नाव देण्यात आले आहे. सी अ‍ॅनिमोन हे कोरल आणि जेलीफिशचाच एक प्रकार आहे. अ‍ॅनिमोन्स हे समुद्राच्या तळाशी असलेल्या खडकांवर किंवा प्रवाळ खडकांवर आढळून येतात. भूक भागविण्यासाठी ते आपल्या विषारी जाळ्यात माशांना अडकवतात. सी अ‍ॅनिमोन्सचे वर्गीकरण सिनिडारिया, अँथोझोआ वर्ग, हेक्साकोरालिया या उपवर्गात केले जाते. अ‍ॅनिमोन्सच्या काही प्रजाती समुद्रसपाटीपासून दहा हजार मीटरपेक्षा जास्त खोलीवर राहू शकतात.

नागरिकांनो काळजी घ्या
समुद्रकिनारी अ‍ॅनिमोन आढळल्यास सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर तुम्ही कधी एखाद्या लहान अ‍ॅनिमोनला स्पर्श केला असेल, तर तुम्हाला जाणवलेली चिकट भावना त्या लहान हार्पूनमुळे उद्भवते. कारण, अ‍ॅनिमोन बोट खाण्याचा प्रयत्न करतो. अ‍ॅनिमोन जीवघेणा नसला तरी काळजी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती गुगलद्वारे मिळाली.

हा अपृष्ठवंशीय प्राणी मांसाहारी असून तो अँथोझोआ या गटात मोडतो. त्याचे शास्त्रीय नाव मेट्रिडिअम असून समुद्रात याच्या 1 हजार प्रजाती आढळतात. या प्राण्याला सामान्यतः फ्लोरल अ‍ॅनिमल किंवा सी अ‍ॅनिमोन असेही म्हणतात. हा प्राणी समुद्रात खोलवर खडकावर चिकटलेला आढळतो.

देवदत्त पोखरकर, पुरातत्व अभ्यासक
Exit mobile version