पाकिस्तानच्या अर्शदचा सुवर्णफेक
| पॅरिस | वृत्तसंस्था|
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात 92.97 मीटर अंतरावर भाला फेकून ऑलिम्पिक विक्रम नोंदवला आणि दिमाखात सुवर्णपदक पटकावले. हे करताना त्याने भारताचा टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला मात दिली. नीरजने 89.45 मीटर अंतरावर भाला फेकला मात्र, त्याला सुवर्णपदकावर समाधान मानावे लागले.
अर्शद नदीमची पॅरिसमधील कामगिरी थक्क करणारी होती. त्याने दोन वेळा 90 मीटरपलीकडे भाला फेकून दाखवला. अशी कामगिरी ऑलिम्पिक अंतिम
फेरीत करणारा तो पहिलाच खेळाडू सुरुवातीच्या प्रयत्नातच त्याने 92.97 मीटरवर भाला फेकून ऑलिम्पिक विक्रमाची नोंद केली. त्यानंतर शेवटच्या प्रयत्नातही 91.79 मीटरवर भाला फेकला. तो दिवस नीरज चोप्राचा नव्हताच. सहापैकी त्याचे पाच प्रयत्न ‘स्टेपिंग मार्क’ ओलांडल्यामुळे फाऊल ठरवण्यात आले. त्यामुळे नदीमसमोर जिंकण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणेच आवश्यक होते आणि ते नीरजला जमले नाही. संपूर्ण अंतिम फेरीत एकट्या नदीमलाच 90 मीटरपलीकडे भाला पोहोचवणे जमले. ऑलिम्पिकमध्ये याआधीचा विक्रम नॉर्वेच्या आंद्रेआस थॉरकिल्डसेनने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नोंदवला होता. त्याने 90.57 मीटर अंतर नोंदवले होते.
पहिले वैयक्तिक सुवर्णपदक अर्शद नदीम हा पाकिस्तानच्या वतीने वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला ॲथलीट ठरला. पाकिस्तानला यापूर्वीची सर्व ऑलिम्पिक सुवर्णपदके हॉकीमध्ये मिळालेली आहेत. 1992 नंतर पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये पदकप्राप्ती झालेली नव्हती. 1960 रोम ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानला हॉकीत सुवर्ण आणि कुस्तीमध्ये कांस्य अशी दोन पदके मिळाली. ते पाकिस्तानसाठीचे आजवरचे सर्वांत यशस्वी ऑलिम्पिक.