| रायगड | प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठाच्या 56 व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग येथील श्रेया स्वप्निल अधिकारी हिने मराठी कथाकथन व हिंदी कथाकथन या दोन स्पर्धांमध्ये रौप्यपदक जिंकून घवघवीत यश संपादन केले आहे.
शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी विद्यार्थी भवन, मुंबई विद्यापीठ, चर्चगेट येथे संपन्न झालेल्या मराठी कथाकथन व हिंदी कथाकथन या स्पर्धांमध्ये सहभाग घेत श्रेयाने आपल्या कथाकथनाने परीक्षकांची व श्रोत्यांची मने जिंकून घेतली. एका दिवसात दोन रौप्यपदकांची कमाई करत श्रेया हिने जे.एस.एम. महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीतही श्रेया हिने हिंदी कथाकथन व मराठी कथाकथन या स्पर्धांमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता.
श्रेयाने प्राप्त केलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. सोनाली पाटील, रायगड जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. श्वेता पाटील यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले आहे. महाविद्यालयाने दिलेला पाठिंबा व उपलब्ध करून दिलेली संधी यामुळे तसेच प्रा. जयेश म्हात्रे व प्रा. सुरभी वाणी यांनी कथेची निवड करण्यापासून सादरीकरण करण्यापर्यंत केलेले मार्गदर्शन यामुळे यशाची ही पायरी गाठता आल्याचे मत श्रेया हिने व्यक्त केले आहे. श्रेया हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे श्रेया राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या संघात निवडीसाठी पात्र ठरली आहे.