स्नेहा मेहतांनी स्वीकारला कार्यभार
| पोलादपूर | प्रतिनिधी |
नगरपंचायत पोलादपूरच्या नगराध्यक्षपदाचे राजीनामे आणि नव्याने कार्यभार स्वीकारण्याच्या संगीत खुर्चीचा खेळ सुरू असून, दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर महिला आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी तिसऱ्या नगरसेविका स्नेहा सचिन मेहता यांना शिवसेना पक्ष संघटनेच्या वतीने संधी देण्यात आली आहे. यानंतरही हा सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ पुढील तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट महिला नामाप्र नगराध्यक्षपदासाठी देखील निवडणुकीचा समावेश असल्याने दुसरा पंचवार्षिक कालावधी संपल्यानंतर थांबण्याची लक्षणे दिसत आहेत.
शिवसेना पक्ष संघटनेच्या निर्णयानुसार शिल्पा देवेंद्र दरेकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त नगराध्यक्षपदासाठी स्नेहा सचिन मेहता यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025 रोजी पोलादपूर नगरपंचायत मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्याकडे निवडणूक कार्यक्रमानुसार दाखल करण्यात आले. या नामनिर्देशन पत्राची छाननी पिठासन अधिकारी महाड उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांच्याकडून करण्यात आली. यानंतर नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याची औपचारिकता 25 नोव्हेंबरला होणार हे निवडणूक कार्यक्रमानुसार निश्चित झाले.
मंगळवार, दि. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजता पोलादपूर नगरपंचायत शिवसेना पक्षाचे गटनेते मनोज प्रजापती, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, नगरसेवक नागेश पवार, सिद्धेश शेठ, विनायक दीक्षित, निखिल कापडेकर, सोनाली गायकवाड, शिल्पा दरेकर, अस्मिता पवार, स्वीकृत नगरसेविका मृगया शहा आदी नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत स्नेहा मेहता यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
