हाडातील घनतेची मोफत तपासणी; 135 नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ
| अलिबाग | वार्ताहर |
सेवासंकल्प प्रतिष्ठान, रायगडने सामाजिक बांधिलकी जपत रविवार, दि. 18 सप्टेंबर रोजी मोफत वातविकार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात बीएमडी ही हाडातील घनता मोजण्याची चाचणी मोफत करण्यात आली. दरम्यान, सेवासंकल्प प्रतिष्ठानचे रायगड जिल्हाप्रमुख डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी उपस्थित नागरिकांना सांधेदुखीसंदर्भातील तक्रारींवर मोफत उपचार व मार्गदर्शन केले.
अलिबाग कोळीवाडा येथील शिवलकर नाक्याजवळ असणार्या डॉ. प्रसाद दाभोळकर यांच्या दवाखान्यात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. दाभोळकर यांनी, सध्या योग्य आहार आणि व्यायाम यांच्या अभावामुळे सांधेदुखीचे प्रमाण खूप वाढीस लागले आहे. परंतु, बीएमडीसारख्या चाचण्यांमुळे त्यावर योग्य ते उपचार करणे सुलभ होते, असे नमूद केले.
या शिबिराचा 135 नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरादरम्यान, मिलिंद कवळे, मंदार गडकरी आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट देत डॉ. दाभोळकर यांच्या कार्याचे कौतुक केले.